can Prakash Ambedkar Owaisi gather record break crowd ? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

प्रकाश आंबेडकर- ओवैसी यांच्या सभेला रेकार्ड ब्रेक गर्दी होणार का ? 

जगदीश पानसरे
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर  गर्दीचे रेकॉर्ड  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आहे .

औरंगाबाद: बहुजन वंचित आघाडी व एमआयएम यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करणारी प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची एकत्रित जाहीर सभा आज (ता.२) औरंगाबाद येथे होत आहे. 

औरंगाबादच्या बीडबायपास रोडवरील जबिंदा मैदानावर ही सभा होत आहे. दुपारी बारा वाजता होणाऱ्या या सभेला राज्यभरातून पाच लाख लोक येणार असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. या मैदानावर राजकीय स्वरूपाची पहिलीच सभा आहे . 

औरंगाबाद शहरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आणि आम खास ही दोन मोठी मैदाने राजकीय सभांसाठी प्रसिद्ध आहेत. 

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर  गर्दीचे रेकॉर्ड  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आहे . बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सभा या मैदानावर घेतलेल्या होत्या . ठाकरेंच्या सभेला  या मैदानावर पाय ठेवायला जागा राहत नसे आणि संपूर्ण मैदान खचाखच भरलेले असे . 

तर आम खास मैदान काँग्रेसच्या सभांसाठी राखीव राहिलेले आहे . सोनिया गांधी यांची रामकृष्णबाबा पाटील  यांच्या प्रचारासाठी झालेली सभा मोठी मानली जाते . 

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि असॊदोद्दीन ओवैसी यांच्या सभेला किती गर्दी होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे . प्रकाश आंबेडकरांच्या सोलापूरच्या सभेला झालेल्या गर्दीने राजकीय निरीक्षकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत . 

या सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन सहायक पोलीस उपायुक्त, दहा पोलीस निरीक्षक, वीस सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, दिडशे कर्मचारी, पन्नास महिला पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी व दोन स्टायकिंग फोर्स तैनात करण्यात येणार आहे.

राज्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांचे काल रात्रीच शहरात आगमन झाले.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी या दोन नेत्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा आणि बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले याची माहिती सभेत दिली जाणार आहे.

इम्तियाज  जलील यांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. तर खासदार ओवेसी इम्तियाज जलील यांच्या घरीच थांबले होते.  

 

संबंधित लेख