Can MLA tileakr inducted in cabinet? | Sarkarnama

टिळेकरांना खरेच मंत्रिपदाचा टिळा लागणार?

उमेश घोंगडे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड येथून राज्याच्या मंत्रिमंडळात कोण समाविष्ट होणार, याची स्पर्धा तीव्र झालेली आहे. जिल्ह्यातून बाळ भेगडे, पिंपरी-चिंचवडमधून लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचेही नाव या चर्चेत आता आले आहे.

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र खरेच टिळेकरांना मंत्रिपदाचा टिळा लागणार का, याबाबत विविध तर्क व्यक्त होत आहेत. 

गिरीश बापट व दिलीप कांबळे यांच्या रूपाने पुणे शहराकडे सध्या दोन मंत्रिपदे आहेत. मावळचे आमदार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाची चर्चा दिवाळीपूर्वी जोरात होती. पिंपरीतून लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे देखील प्रयत्नशील आहेत. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड अशा तीनही ठिकाणच्या आमदारांना मंत्रिमंडळात कितपत स्थान मिळेल, याची शंकाच आहे. 

तरूण वय ही टिळेकर यांची मोठी जमेची बाजू आहे. तरूणांची मोठी फौज ही त्यांची आणखी एक जमेची बाजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. टिळेकर यांच्याकडे प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्षपद आहे. या पदाच्या निमित्ताने त्यांनी राज्यभर दौरे आखून युवा मोर्चाचे काम वाढविले आहे. प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने साहजिकच त्यांचा वरिष्ठ पातळीवरील संपर्कही वाढला आहे. माळी समाजाचा चेहरा मंत्रिमंडळात हवा म्हणून योगेश टिळेकर आणि नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. 
नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचे फडणवीस यांनी ठरविले असले तरी विद्यमान मंत्रिमंडळातील कोणाला अर्धचंद्र देणार यावर बरीच समीकरणे असल्याचे बोलण्यात येते. 

पुणे शहराच्या दृष्टीने विचार केला तर पुणे शहरातून जे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले आहेत, ते कधीच पाच वर्षांची टर्म पूर्ण करीत नाहीत, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. शशिकांत सुतार असोत की वसंत चव्हाण यांनाही पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच पद सोडावे लागले होते. तसेच दिलीप कांबळे (1995), बाळासाहेब शिवरकर (1999), चंद्रकांत छाजेड (2003), रमेश बागवे (2008) यांनी पुणे शहरातून राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांनाही पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात असलेले गिरीश बापट आणि दिलीप कांबळे यांनाही सलग पाच वर्षे मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. पुण्याची "परंपरा' या दोघांनी पाळली तर नव्या चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो.

माधुरी मिसाळ या अनुभवी आमदार म्हणूनही पुण्यातून स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे टिळेकर यांचे नाव चर्चेत असले तरी मंत्रिपदाचा टिळा कोणाच्या माथी लागणार, याची उत्सुकता अखेरपर्यंत राहणार आहे. मात्र या चर्चेमुळे टिळेकर यांचे समर्थक खूष आहेत. 
 

संबंधित लेख