कोरेगावात शशिकांत शिंदेंना महेश शिंदे अडविणार का?

कोरेगावात शशिकांत शिंदेंना महेश शिंदे अडविणार का?

सातारा : कोरेगाव मतदारसंघात भाजपने महेश शिंदेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना अडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मध्यंतरी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळपासून भाजपच्या नेत्यांना कोरेगाव मतदारसंघाबाबत आशा निर्माण झाली आहे. दोन शिंदेंपैकी कोणत्या शिंदेला कोरेगांवकर डोक्‍यावर घेणार याची उत्सुकता आहे. 

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचावर्षिक राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शशिकांत शिंदे हे आमदार आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालिन आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांचा पराभव झाला. त्यांनी आर्थिकनिकषावर आरक्षणाचा मुद्दा लावून धरून राष्ट्रवादी व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यामुळे त्यांना तिकिट न देता राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जावळीतून शशिकांत शिंदे यांना कोरेगावात आणून विधानसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना 80 हजार 373 मते मिळाली होती. तर अपक्ष डॉ. शालिनीताई पाटील यांना 48 हजार 620 मते मिळाली होती. 

शिवसेनेतून संतोष जाधव यांना 16 हजार 621 मते तर कोरेगाव विकास आघाडीचे नेते यशवंत भोसले यांना दहा हजार 701 मते मिळाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे 95 हजार 213 मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे ऍड. विजयराव कणसे यांना 47 हजार 966, शिवसेनेचे हणमंत चवरे यांना 15 हजार 786, स्वाभिमानी पक्षाचे संजय भगत यांना 13 हजार 126 मते मिळाली होती. 

गेल्या दोन निवडणुकीतील या मतदारसंघातील चित्र लक्षात घेता शशिकांत शिंदे यांचे मताधिक्य वाढत आहे. पण यावेळेस या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने लक्ष घातले आहे. भाजपकडून महेश शिंदे यांचे नाव आहे. महेश शिंदे यांनी मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्यास सुरवात केली असून गावोगावी पोस्टरच्या माध्यमातून आपण इच्छुक असल्याचे मतदारांपुढे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. महेश शिंदे हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. ते जिल्हा परिषद सदस्यही होते. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. व्यवसायाने उद्योजक असलेले श्री. शिंदे यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते कोरेगाव मतदारसंघातून इच्छुक असून त्यांना महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे पाठबळ मिळत आहे. मध्यंतरी खटावमध्ये झालेल्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळेपासून महेश शिंदे हे कोरेगावातून आमदार शशिकांत शिंदेंच्या विरोधात निवडणुक लढणार हे निश्‍चित झाले आहे. तरीही एक राष्ट्रवादीतील शिंदे आणि दुसरा भाजपकडील शिंदे यांच्यापैकी कोरेगावकर कोणाला साथ देणार यावर या मतदारसंघाचे गणित अवलंबून आहे. 

कोरेगाव मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद गटात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन राजांची ताकद निश्‍चितपणे आमदार शशिकांत शिंदेंसोबत राहिल. पण सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी काळात राष्ट्रवादीचे नेते कोणती भूमिका घेणार यावर सर्व काही अवलंबून आहे. 

कोरेगाव मतदारसंघातून इच्छुक असलेल्या महेश शिंदेंनी या मतदारसंघात ठिकठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून जागृती सुरू केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंवर पोस्टर बॉय म्हणून टिका केली होती. भाजपच्या ताकतीवर पोस्टर बॉय आगामी काळात आमदार शिंदेंपुढे आव्हान निर्माण करू शकणार का, याची कोरेगावात उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com