Can Girish Mahajan will Prove his Leadership In Jalgaon | Sarkarnama

गिरीश महाजनांच्या पंखाला नेतृत्वाचे बळ मिळणार का? 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 31 जुलै 2018

जिल्ह्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, (कै.)मधुकरराव चौधरी, (कै.)जे.टी.महाजन, (कै.)के.एम.पाटील अरूणभाई गुजराथी, एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन,आमदार डॉ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविले आहे. शिवाय याच माध्यमातून त्यांच्याकडे जिल्ह्यातील त्या -त्या पक्षाचे नेतृत्वही म्हणूनही पाहिले गेले आहे. परंतु महाजन हे नाशिक जिल्ह्यात यशस्वी असले जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि पक्षाच्या नेतृत्वाबाबत त्यांना संधीच मिळाली नाही.

जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील मोर्चे, आंदोलने, तसेच दिल्लीतील अण्णा हजारेंच्या मोर्चातही त्यांनी मध्यस्थी केली आहे. या शिवाय नाशिक महापालिका, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे. जळगाव महापालिका निवडणूकही पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवित आहे. तालुकास्तरावरील हे नेतृत्व आता राज्यात भरारी घेत असतांनाच जळगाव जिल्ह्यात एकेकाळी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे, त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी निवडणूकीच्या निमित्ताने अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे. यात त्यांना यश मिळाल्यास त्यांच्या नेतृत्वाच्या पंखाला बळ मिळेल व जिल्ह्यातील नेतृत्वात त्यांचेही नाव असणार आहे. 

जळगाव महापालिकेची निवडणूक असली तरी जनतेचा आगामी पक्षीय कल तसेच नेतृत्व याबाबतीत ती महत्वपूर्ण ठरणार आहे. भाजप-सेना स्वतंत्र लढत असल्याने आगामी लोकसभेच्यादृष्टीने आपल्या पक्षाचे बळ कळणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाची आघाडी केल्यास जनता किती साथ देणार याचीही चाचणी होणार आहे.

शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांच्या राजकीय स्थितीत केल्या साडेचार वर्षापासून अनेक उतार आले आहेत. महापालिकेत त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहेच गेल्या वेळी ते निवडणूक मैदानात नव्हते यावेळी ते मैदानात असून स्वत: प्रचारातही फिरले आहेत. ते पुन्हा या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व आजमावत आहेत. महापालिकेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची ही परिक्षाच आहे. त्यांना यश मिळाल्यास त्यांच्या नेतृत्वाचा करिष्मा अद्यापही कायम आहे, याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

भाजपतर्फे गिरीश महाजन यांनी या निवडणुकीचे नेतृत्व केले आहे. महाजन राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. नाशिकचे पालकमंत्रीही आहेत, त्या ठिकाणी ते नेतृत्वही करतात त्यांना निवडणुकीतही यश मिळाले आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात त्यांच्याकडे नेतृत्वाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिले जात नव्हते, एवढेच नव्हे तर राज्याचे कॅबिनेटमंत्री असतांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोल्हापुरच्या चंद्रकांतदादा पाटलांकडे आहे. त्यामुळे महाजन यांना आपले जिल्ह्यातही नेतृत्व आहे हे जळगाव महापालिका निवडणूकीच्या माध्यमातून सिध्द करून दाखवायचे आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री असतांनाही पाटील यांनी महापालिका निवडणूकीत फारसे लक्ष दिले नाही, महाजन यांनीच पक्षाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी पायी प्रचार करण्यासह सभाही घेतल्या आहेत. त्यामुळे या निवडणूकीतील यशाची आणि पराभवाचीही जबाबदारी महाजन यांच्यावरच असणार आहे. परंतु या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत यश महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी महाजन जीवाचे रान करीत आहेत हे मात्र निश्‍चित. 

जिल्ह्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, (कै.)मधुकरराव चौधरी, (कै.)जे.टी.महाजन, (कै.)के.एम.पाटील अरूणभाई गुजराथी, एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन,आमदार डॉ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविले आहे. शिवाय याच माध्यमातून त्यांच्याकडे जिल्ह्यातील त्या -त्या पक्षाचे नेतृत्वही म्हणूनही पाहिले गेले आहे. परंतु महाजन हे नाशिक जिल्ह्यात यशस्वी असले जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि पक्षाच्या नेतृत्वाबाबत त्यांना संधीच मिळाली नाही.

त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना जिल्ह्यातील नेतृत्वाची संधी मिळणार आहे. शिवाय जैन यांच्या नेतृत्वाला टक्कर देवून आपण यश मिळवू हेही सिध्द करता येणार आहे. ज्यांच्या बळ पंख वाढविले त्यानाच आपण पंखाखाली घेवून भरारी घेवू शकतो हे दाखविण्याचीच त्यांची परिक्षा आहे. त्यामुळे जळगाव महापालिका निवडणुकीत उद्या (ता. 1) रोजी मतदानावरच जिल्ह्यातील नेतृत्व आणि लोकसभा निवडणुकीची दिशा ठरणार हे मात्र निश्‍चित आहे.

येथे क्लिक करा आणि डाऊनलोड कर सरकारनामा मोबाईल अॅप

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख