नंदूरबार लोकसभा मतदारसंघ : इंदिरा गांधींवरील आदिवासींच्या प्रेमाचा फायदा काँग्रेस उठवणार?

मोदी लाटेत ऐनवेळी भाजपने दिलेला तरुण चेहरा म्हणून राजकीय कार्य नसतांनाही डॉ. हीना गावित यांनी नऊवेळचे विजेते ज्येष्ठ नेते माणिकराव गावितांचा पराभव करून एक नवा इतिहास रचला खरा, पण कॉंग्रेसने आता लाटेवरील भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. इंदिरा गांधींना माय अर्थात आईसमान मानणाऱ्या आदिवासी जनतेसाठी प्रियांका गांधी यांची सभा घेत राज्यातील प्रचार सुरू करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
Heena Gavit - KC Padvi - Bharat Gavit - Shirishkumar Naik
Heena Gavit - KC Padvi - Bharat Gavit - Shirishkumar Naik

नंदुरबार : हा जिल्हा आणि गांधी घराणे यांचे नाते अतूट आहे. विजयाचे गणित सोपे असलेला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत मोदी लाट आणि जनतेला नवा चेहरा हवा, बदल हवा म्हणून झालेले मतदान यामुळे कॉंग्रेसच्या हातून गेला. सतत नऊवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या माणिकराव गावित यांना लाखांच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अर्थात कॉंग्रेसला या निवडणुकीत मिळालेली मते गतवेळच्या निवडणुकीपेक्षाही 6.31 टक्के जास्त होती, यावरून आदिवासी जनता कॉंग्रेसपासून दूर गेलेली नव्हती हेही स्पष्ट होते.

मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपने या सहज मिळालेल्या मतदारसंघाकडे पाहिजे तसे लक्ष न दिल्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. आदिवासींचे आणि मतदारांचे प्रश्‍न कायम राहिले आहेत. पक्षसंघटन म्हणून भाजपने ज्या वेगाने काम करायला पाहिजे होते तसे झालेले नसल्याचे खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या आढावा बैठकीतही दिसून आल्याने भाजपला गड राखण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतील.

भाजपकडून सध्या तरी डॉ. हीना गावित यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार नाही, त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल असे सध्यातरी दिसते. खुद्द त्यांच्यासह वडील आमदार डॉ. विजयकुमार गावित हेही राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. त्यासाठी कॉंग्रेसने ही जागा सोडावी यासाठी आणि वेळ आलीच तर डॉ. विजयकुमार गावितांनीच कॉंग्रेसमध्ये यावे अन लोकसभा लढवावी असे राजकीय डावपेच आखले जात होते, मात्र कॉंग्रेसने सपशेल नकार दिला. त्यामुळे सध्या स्थिती जैसे थे आहे. खुद्द डॉ.गावितही लोकसभा लढविण्यास फारशे इच्छुक नाहीत.

भाजपची उमेदवारी डॉ. हीना यांनाच मिळेल असे चित्र आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित आणि धडगावचे कॉंग्रेसचे आमदार अॅड. के. सी. पाडवी, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे चिरंजीव शिरीषकुमार नाईक यांनी उमेदवारीसाठी इच्छा दर्शविली आहे. या रेसमध्ये असलेले माजीमंत्री पद्माकर वळवी यांनी मागे पडत विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.

त्यामुळे भरत गावित, ऍड. के.सी. पाडवी व शिरीषकुमार नाईक यांच्यापैकी एक जण कॉंग्रेसचे उमेदवार असतील. तिघांचे पारडे आजमितीस जड असले तरी तिघांनी पक्ष उमेदवारी देईल त्याला निवडून आणायची जबाबदारी आपली आहे असे मेळाव्यातून सांगणे सुरू केले आहे, याचाच अर्थ उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही हे स्पष्ट होते. उमेदवारी न मिळालेल्यांचे राजकीय पुनर्वसन आमदारकी, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या रूपाने ज्येष्ठ नेते करू शकतील.त्यामुळे कॉंग्रेस एकदिलाने भाजपला खिंडीत पकडण्यासाठी एकेक पावले टाकत आहे.

2014 चे मतविभाजन
डॉ. हीना गावित (भाजप) : ५, ७९, ४८७ (५१.८९ टक्के - विजयी)
माणिकराव गावित (कॉंग्रेस) : ४, ७२, ५८१ (४२.३२ टक्के)
अमित वसावे ( बीएसपी) : १२,१३३ (१.०८ टक्के)

प्रश्‍न मतदारसंघांचे
आदिवासींचे स्थलांतर अन कुपोषणाचा प्रश्‍न
बेरोजगारी दूर करण्याचे आव्हान कायम
शिरपूरचा साखर कारखानाही अजूनही बंद
साक्रीचा पांझराकान कारखाना अजूनही बंदच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com