नांदेडच्या यशाचा पॅटर्न अशोक चव्हाण यांना राज्यात राबवता येईल का ?

नांदेडच्या यशाचा पॅटर्न अशोक चव्हाण यांना राज्यात राबवता येईल का ?

पुणे : नांदेड महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व विजयाने काँग्रेसच्या दिल्ली दरबारात अशोक चव्हाण यांचे वजन वाढणार आहे. मात्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने नांदेडच्या यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात आगामी निवडणुकात करून दाखवण्याचे आव्हान अशोक चव्हाण यांच्यासमोर राहणार आहे . 

प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या एका माजी मुख्यमंत्र्याने आपल्या कर्मभूमीतील महापालिका निवडणूक जिंकली तर एव्हढी चर्चा सामान्य परिस्थितीत झाली नसती. पण महाराष्ट्रात भाजपने गेल्या वर्षभरात महापालिका आणि ज़िल्हा परिषदात विजयाचा धडाका लावला होता. जेथे भाजपचे संघटन मजबूत नाही, जेथे भाजपचे स्थानिक नेतृत्व मजबूत नाही अशा शहरात आणि जिल्ह्यात विरोधी पक्षांचे आणि मित्र पक्षाचेही नेते फोडून घ्यायचे. त्यांच्या मदतीला १० -१२ मंत्र्यांचा लवाजमा उभा करायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे प्रचार करायचा. मुख्यमंत्र्यांची सभा ठेवायची. सोशल मीडियावर विरोधकांचे वाभाडे काढायचे.निवडणूक प्रचार साहित्याचा भरपूर पुरवठा करायचा आणि निवडणूक जिंकायची, असा पॅटर्न भाजपने प्रस्थापित केला होता . 

भाजपच्या झंझावातापुढे मोठमोठ्या नेत्यांचे बालेकिल्ले गारद झाले होते. अजित पवारांच्या ताब्यातून पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिका गेल्या. राज ठाकरेंचे नाशिक भाजपने काबीज केले. सुशीलकुमार शिंदेंच्या सोलापूर महापालिकेत भाजपचे कमळ फुलले. पृथ्वीराज चव्हाण यांना कराड राखता आले नव्हते. गेल्या वर्षभरात भाजपने बारा महापालिका जिंकल्या. अनेक जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्या. आता भाजप नेते ग्रामपंचायतीतही आमचेच सर्वाधिक सरपंच आल्याचा गर्जना करू लागले होते. 

यापार्श्वभूमीवर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी भाजपचे आव्हान परतवून लावले. भाजपच्या प्रत्येक डावपेचाचे त्यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपच्या थिंक टॅन्कमधील चाणक्यांवर मात करणारे डाव अशोरावनी नांदेडमध्ये टाकले. पैसे आणि बळाच्या वापरातही ते भाजपला पुरून उरले. एव्हढेच नव्हे तर ८१ पैकी ७३ नगरसेवक निवडून आणताना सर्व विरोधकांची धूळधाण उडवली. सतत पराभवास सामोरे जाऊन आत्मविश्वास खचू लागलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपला पराभूत करणे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. सरकार कोणत्या चौकश्या मागे लावेल या चिंतेत दबून राहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना 'आदर्श' प्रकरणाचा ससेमिरा मागे लागलेला असतानाही अशोकरावांनी कसे लढायचे हे दाखवले. नारायण राणे यांच्यासारख्या तोफा न डागता देखील सायलेन्सर लावलेल्या रिव्हॉल्व्हरने अचूक लक्षवेध साधता येतो हे सायलेंट किलर अशोकरावांनी दाखवून दिले. त्यामुळे या यशाचे महत्व आहे. 

आधी खासदारकीच्या निवडणुकीत आता महापालिका निवडणुकीत विजयी होत अशोकरावांनी भाजपाविरुद्ध लागोपाठ दुसरा राउंड जिंकला आहे. आता लोकसभा- विधानसभेला अंतिम व निर्णायक लढत होईल. त्यावेळी अशोक चव्हाणांच्या ताकदीचा पुरेपूर अंदाज आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते अधिक तयारीसह लढतीत उतरलेले असतील . 

काँग्रेस पक्षात आता अशोक चव्हाण यांच्याविषयी अपेक्षा वाढलेल्या असणार आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाचा यापुढील काळात अधिक कस लागणार आहे. आदर्श प्रकरणाची न्यायालयीन लढाई सुरु आहेच. भाजप भविष्यात अशोकरावांना ब्रेक लावण्यासाठी आणखी जी प्रकरणे उकरून काढील त्यांचा मुकाबला अशोकरावांना एका बाजूला करावा लागेल तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज करावा लागेल . 

जेंव्हा काँग्रेस पक्षाला देशात आणि राज्यात सत्ता सहजसाध्य होती तेंव्हा आपल्या जिल्ह्यावर पकड ठेवायची आणि हायकमांडची मर्जी संपादून सत्तेची सर्वोच्च पायरी गाठायची स्ट्रॅटेजी योग्य होती. त्यावेळी राज्यात मोठा प्रभाव आणि व्यापक जनाधार असणे हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी डिसक्वालिफिकेशन होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक लो प्रोफाईल धोरण ठेवले होते. पूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काही प्रमाणात सोनिया गांधींच्या करिष्म्यावर काँग्रेसजनांना सत्तेचा सोपान गाठता येत असे.आता गांधी घराण्याचा प्रभाव ओसरला आहे . 

राहुल गांधी यांचा करिष्मा नरेंद्र मोदींच्या करिष्म्यासमोर फिका पडतो हे वारंवार दिसते आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना जुने धोरण आता बाजूला ठेवावे लागणार आहे. स्वतःचा जनाधार त्यांना निर्माण करावा लागेल. काँग्रेसचे जिल्हा आणि तालुका स्तरावरील संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरावे लागेल. मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात काँग्रेसचे संघटन पूर्वी मजबूत होते. आज ते खिळखिळे झाले आहे. त्याची डागडुजी करावी लागेल.

नारायण राणे काँग्रेसबाहेर पडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण वगळता दिल्ली दरबारी वजन असलेला मोठा प्रतिस्पर्धी अशोकरावांना राहिलेला नाही. पण भाजप प्रवेशासाठी काँग्रेसचे आणखी काही मातब्बर नेते कुंपणावर बसलेले आहेत त्यांना पक्षात पुन्हा सक्रिय करण्याचे आव्हान अशोकरावांसमोर राहणार आहे. नागपूर मधून सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर तोफा काही नेते डागत आहेत. ते तात्पुरते शांत होतील पण त्यांना चुचकारून आपलेसे करण्याचे कौशल्य अशोकराव दाखवतील का?  . 

अशोक चव्हाण हे व्यवस्थापनाचे पदवीधर आहेत. त्यांचे नियोजन फार काटेकोर आणि बारकाईने असते. आपल्या राजकीय हालचालीबाबत ते गोपनीयता बाळगतात. प्रतिस्पर्ध्याला बेसावध ठेवण्यावर त्यांचा भर असतो. स्ट्रॅटेजिला ते पक्के आहेत.  नांदेडसारखा आपला प्रभाव राज्यभर निर्माण करण्यासाठी अशोकराव अधिक वेळ आणि अधिक परिश्रम करणार का? . वजाबाकीची गणितात आपण पारंगत आहोत हे त्यांनी नारायण राणे सारख्या विरोधकांना दाखवून दिले होते. आता राजस्तरावर आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी बेरजेच्या राजकारणावरही भर द्यावा लागेल. आदर्श प्रकरणाची टांगती तलवार डोक्यावर असताना अशोकराव कुठपर्यंत मजल मारतात, हे काळच ठरवेल . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com