शिवसेना- भाजपच्या विरोधात अजित पवार -राज ठाकरेंच्या तोफा एका व्यासपीठावरून धडाडतील का ?  

raj Ajit
raj Ajit

बारामती शहर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  भाजपच्या विरोधात तडाखेबंद भाषणे करीत आहेत . मनसे  नेते राज ठाकरे  यांनी तर भाजप विरोधात केंव्हाच तोफा डागायला सुरवात केलेले आहे . वरती हे  दोघे नेते एकमेकांच्याही विरोधातही  बोलत असतात .

पण आगामी निवडणुकांत परस्परातील मतभेद थोडे बाजूला ठेवून हे दोघे  एका व्यासपीठावर येऊन भाजपच्या विरोधात तोफा डागतील काय ? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे . 

 बदलत्या राजकीय परिस्थितीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत नेमके काय चित्र निर्माण होईल या बाबत आता आडाखे बांधायला प्रारंभ झाला आहे. राज्यात भाजप सेनेच्याच सरकारला पुन्हा संधी मिळणार का ? की  राज्यात बदल होऊन नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार ?  याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. 

राष्ट्रवादी आणि मनसेचे संबंध मधुर व्हायला लागल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत असल्याने आता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यात ‘’अजितराज”होईल का अशी चर्चा सुरु झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुलाखतीपासूनच राज ठाकरे यांनी सातत्याने पवार यांच्याशी संपर्क  ठेवला आहे.

अजित पवार व राज ठाकरे यांच्यात शाब्दिक युध्द सुरु असले तरी ज्या नेत्यांची राज्यात क्रेझ आहे अशा नेत्यात या दोघांची गणना होते . आगामी निवडणूकीच्या निमित्ताने अजित पवार व राज ठाकरे एका व्यासपीठावर  येतील का, अशी चर्चा ग्रामीण भागात सुरु आहे. 

अजित पवार व राज ठाकरे हे दोघेही रोखठोक बोलण्यासाठी प्रसिध्द असल्याने त्यांच्याभोवती कायमच वलय असते. राज्यातील भाजप व शिवसेनेच्या विरोधातच राज ठाकरे यांची भूमिका आहे. सर्वच प्रादेशिक पक्ष समान विचारधारेच्या आधारावर एकत्र यावेत अशी भूमिका खुद्द शरद पवार यांनीच मांडली आहे . अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या दोन पक्षांच्या विचारधारेत भाजपला विरोध एवढे सोडले बाकी काही साम्य नाही . दोन पक्षांची विचारधारा संपूर्णपणे वेगळी आहे . 

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात  कॉंग्रेस -  राष्ट्रवादी काँग्रेसच्या  आघाडीत उघडपणे  मनसे सहभागी होईल  का याविषयी शंका आहे . पण मुंबई , नाशिक , पुणे येथे काही जागांवर लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपात या पक्षात उघड किंवा छुपा समझौता होणे अशक्य वाटत नाही . 

पण अजित पवार व राज ठाकरे  प्रचारात एकत्र आले तर भाजपचे धाबे दणाणू शकते अशी  विचारधारा असलेले काही कार्यकर्ते शहरी आणि ग्रामीण भागात आहेत. एकाच राजकीय पक्षाला संपूर्ण बहुमत मिळण्याचे दिवस सरलेले असल्याने प्रादेशिक पक्षांची मोट बांधूनच सत्ता मिळणार आहे हे सर्वांनाच माहिती आहे . पण राज ठाकरे यांची परप्रांतीयांविरुद्धची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य होणार नाही  आणि राजकीयदृष्ट्या  परवडणारही नाही . 

पण राज ठाकरे असे काही वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवायला तयार होतील का ? आणि ते तयार झाले तरी काँग्रेस आघाडी त्यांचा स्वीकार करणार का हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे . मुंबई शहर , उपनगर , ठाणे , पुणे शहर , नाशिक , औरंगाबाद , अमरावती भागात राज ठाकरेंचा प्रभाव आहे . त्याचा लाभ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजप विरोधक पक्षांना होऊ शकतो . तसाच तो राज ठाकरे यांच्या मनसेलाही होऊ शकतो . यामुळे पक्षवाढीसाठी राज ठाकरे आपली भूमिका थोडी बदलतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे . 

भविष्यात अजित पवार व राज ठाकरे एकत्र वाटचाल करताना दिसतील का या बाबत औत्सुक्य आहे. अर्थातच शरद पवार या संदर्भात काय भूमिका घेतात या वर पुढील सर्वच समीकरणे अवलंबून असतील.  त्या मुळे महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूकीत अजित पवार व राज ठाकरे हे समीकरण जाहीर सभांपुरते  तरी  जुळेल का या बाबत उत्सुकता आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com