बैलगाडी शर्यतीसाठी नवीन नियम व अटी

 बैलगाडी शर्यतीसाठी नवीन नियम व अटी

मुंबई : बैलगाडी शर्यत ही परंपरा असल्याचा दावा केला जात असेल, तर या शर्यतींसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाऊ नये आणि कोणतेही बक्षीस देऊ नये, अशी सूचना "ऍनिमल इक्‍विटी इंडिया'ने राज्य सरकारला केली होती; मात्र ती फेटाळून लावत सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी नवीन नियम व अटी तयार केल्या आहेत.

 बैलगाडी शर्यतींचा बिगुल वाजवण्यास आक्षेप घेणाऱ्या संस्थांनी सूचवलेल्या 52 पैकी 34 सूचना राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. नागरिकांकडून मागवलेल्या बहुतांश हरकती-सूचनांचा समावेश करून नवीन नियमावलीसह सरकार उच्च न्यायालयात येत्या दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. 

बैलगाडी शर्यतीत प्राण्यांना इजा होत असल्याचा आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या शर्यतींसाठी कोणत्याही प्रकारचे नियम व अटी जाहीर केलेल्या नसल्याने या स्पर्धेवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात स्पर्धेसाठी हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने राज्यात सध्या बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. 

दिवाळीपूर्वी बैलगाडी शर्यतींवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. बैलगाडी शर्यतींसाठी नियम व अटी ठरवण्यासाठी नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या; मात्र केवळ सहा जणांनी सूचना व हरकती पाठवल्या. त्यापैकी ऍनिमल इक्‍विटी इंडियाने 23 हरकती आणि 21 सूचना; तसेच अजय मराठे, डायना रतनागर यांनी सात प्रकारच्या सूचना व हरकती पाठवल्या आहेत. त्यापैकी 34 सूचनांचा समावेश राज्य सरकार नियम व अटींमध्ये करणार आहे; मात्र 18 सूचना अजिबातच व्यवहार्य नसल्याने किंवा इतर कायद्यांच्या आड येणाऱ्या असल्याने त्या फेटाळण्यात आल्या, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

एका जिल्ह्यात एका दिवशी पाचपेक्षा अधिक बैलगाडी शर्यती होऊ नयेत, बैलगाडी शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलांना प्रशिक्षण द्यावे किंवा स्पर्धेच्या ठिकाणी पॅनलवरील पशुवैद्यक डॉक्‍टर नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी आदी सूचना फेटाळण्यात आल्या. बैलगाडी शर्यत सुरू होण्यापूर्वी आणि त्यानंतरही बैलांच्या आरोग्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती. 

शर्यतीच्या ठिकाणी प्राण्यांसाठी ऍम्ब्युलन्स असावी, दुपारी 12 ते 3 च्या सुमारास कडक ऊन असल्याने या वेळेत शर्यती घेऊ नयेत, बैलगाडी शर्यत पारंपरिक असल्याचा दावा राज्य सरकार करत असेल तर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये आणि बक्षिसे देऊ नयेत, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या; मात्र त्या फेटाळण्यात आल्या आहेत. त्याविषयीचे स्पष्टीकरण आमच्याकडे असून उच्च न्यायालयासमोर ते मांडले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

व्यवहार्य सूचना
शर्यतीच्या मार्गावर मोटरसायकल धावणार नाहीत. बैलजोडी सारख्याच उंचीची असेल याचीही खात्री करण्याची सूचना मान्य करण्यात आली आहे. बैलजोडी एकापेक्षा अधिक शर्यतींत भाग घेणार असेल, तर दोन्ही शर्यतींत किमान 40 मिनिटांचे अंतर असावे आणि दिवसाला तीनपेक्षा अधिक शर्यतींत त्या बैलांना घेऊ नये, ही सूचनाही स्वीकारण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com