Buldana : Gaurdian Minister Yerawar to miss flag hosting ceremony | Sarkarnama

बुलडाणा :पालकमंत्री येरावार आताही  मुहूर्त हुकविणार !

 अरूण जैन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अपेक्षित असताना शिवसेनेचे मंत्री झेंडा वंदन करतील आणि भाजपाचे नेते कार्यकर्ते टाळ्या वाजवतील अशी परिस्थिती झाली असल्याने सगळाच आनंदी आनंद आहे.

बुलडाणा : तत्कालीन कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर ७ जुलैला सरकारने राज्याचे ऊर्जा पर्यटन, अन्न व औषध मंत्री मदन येरावार यांची बुलडाणा जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केली. मात्र या गोष्टीला महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटूनही नवीन पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यासाठी वेळ मिळाला नाही.

त्यामुळे ते आता स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन करण्यासाठी नक्की येतील अशी आशा होती. पण ती देखिल आता मावळली आहे. त्यांच्या जागी परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत. यामुळे साहेबांचा हा देखील मुहूर्त हुकल्यात जमा आहे.

बुलडाणा जिल्ह्याला डाॅ. राजेंद्र शिंगणे व स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने स्थानिक पालकमंत्री मिळाले होते. उर्वरित वेळी केवळ झेंडावंदन व नियोजनाची बैठक याव्यतिरिक्त पालकमंत्री अभावानेच जिल्ह्यात दिसायचे. त्यामुळे अनेकदा कामे खोळंबणे, उशीर लागणे, छोट्या मोठ्या कामांसाठी बाहेर जावे लागणे अशा समस्या येत. आता मात्र भाऊसाहेबांच्या निधनानंतर जिल्ह्याला पालकमंत्री असतात याचा विसरच पडू लागला आहे. 

मध्यंतरी शेतकरी आत्महत्या झाल्या. सिंदखेडराजा तालुक्यात एका शेतक-याने सुडीमध्ये जाळून घेतले. शेतकरी पिक कर्जाअभावी व बोंडअळीमुळे त्रस्त आहे. अनेक कामे मंजूरीअभावी खोळंबली आहेत. पण साहेबांना अजूनही वेळ नाही.

गेल्या चार वर्षांपासून छोट्या मोठ्या अशासकीय नियुक्त्याही झालेल्या नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांना अजूनही आपले सरकार आल्यासारखे वाटत नाही. त्यात भर म्हणून स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अपेक्षित असताना शिवसेनेचे मंत्री झेंडा वंदन करतील आणि भाजपाचे नेते कार्यकर्ते टाळ्या वाजवतील अशी परिस्थिती झाली असल्याने सगळाच आनंदी आनंद आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख