budana political wing | Sarkarnama

विविध पक्षांच्या काळ्या झेंड्यांनी ओलांडल्या निषेधाच्या मर्यादा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

बुलडाणा : सत्ता म्हटली की सत्ताधारी व विरोधी असे दोन पक्ष आलेच. सत्ताधाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आणि विरोधकांनी त्याला विरोध करायचा हा कित्ता नेहमीच गिरवला जातो. विरोध करण्याचा एक प्रकार म्हणजे काळे झेंडे दाखवून निषेध करणे होय. मात्र, हा निषेध कोणी करायचा, कुणाचा करायचा आणि का करायचा? याचा कोणताही विधीनिषेध बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय पक्ष पाळताना सध्या तरी दिसत नाही.

बुलडाणा : सत्ता म्हटली की सत्ताधारी व विरोधी असे दोन पक्ष आलेच. सत्ताधाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आणि विरोधकांनी त्याला विरोध करायचा हा कित्ता नेहमीच गिरवला जातो. विरोध करण्याचा एक प्रकार म्हणजे काळे झेंडे दाखवून निषेध करणे होय. मात्र, हा निषेध कोणी करायचा, कुणाचा करायचा आणि का करायचा? याचा कोणताही विधीनिषेध बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय पक्ष पाळताना सध्या तरी दिसत नाही. सत्तेत असलेल्या भाजपचे कार्यकर्ते विरोधी पक्षातल्या नेत्यांना काळे झेंडे दाखवितात आणि मांडीला मांडी लावून सत्तेची फळे चाखणारी शिवसेना युतीतील सहकारी पक्ष आणि आता मोठा भाऊ बनलेल्या भाजपला काळे झेंडे दाखवते, यावरुन काळे झेंडे कुणाला, कधी आणि का दाखवायचे? याच्या सर्वच मर्यादा भाजपा आणि शिवसेनेने ओलांडलेल्या दिसत आहेत. 

पंधरा दिवसांपूर्वी कॉंग्रेसने कर्जमाफी फसवी असल्याचे सांगून एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते. विरोधक असल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा त्यांचा तो हक्क देखील आहे. मात्र अजुनही आपण सत्तेत आहोत की नाही याचे भान नसलेल्या भाजपने (काही उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांनी) काळ्या झेड्यांचा गेम कॉंग्रेसविरोधात करायचे ठरविले. मात्र, भाजपचे पंधरा आणि कॉंग्रेसचे पंधराशे अशा कार्यकर्त्यांचा गदारोळात काळ्या झेंड्यांच्या पार चिंध्या झाल्या. त्यातच जिल्हा परिषदेच्या सभापती श्‍वेता महाले यांचा पदर आणि मंगळसुत्र पुराण आठवडाभर गाजले. 

या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच उत्साही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना काळे झेंडे दाखविण्याचा पराक्रम करुन टाकला. ज्या पध्दतीने भाजपने कॉंग्रेसच्या नेत्यांना विनाकारण काळे झेंडे दाखविले त्याच प्रमाणे ज्या भाजपच्या मांडीला मांडी लावून शिवसेना सत्ता उपभोगते त्याच भाजपचे जेष्ठ मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी चिखलीत शिवसैनिक जमतात आणि पोलीस त्यांना अटक करुन नेतात. हा सर्व प्रकार करण्यामागे कोणती भुमिका आहे, हे कुणीही समजून घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. 

या दोन्ही घटनांचा विचार केला असता जी भाजप सत्तेमध्ये आहे ती विरोधी पक्षाच्या नेत्यांना झेंडे दाखवून कोणता राजकीय शहाणपणा दाखविते हे अद्याप जुन्या जाणत्या भाजपवाल्यांनाही कळाले नाही. तर दुसरीकडे आपलाच सत्तेतील सहभागी असलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला काळे झेंडे दाखवून चारचौघात हसे करुन घेण्याचा उतावीळपणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 

 

संबंधित लेख