रामप्रसाद बोर्डीकरांच्या जुन्या वादग्रस्त व्हिडिओने पोलिसांची पळापळ 

रामप्रसाद बोर्डीकरांच्या जुन्या वादग्रस्त व्हिडिओने पोलिसांची पळापळ 

औरंगाबादः परभणी जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पूर्वाश्रमीचे माजी कॉंग्रेस आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात पोलीसांना उद्देशून त्यांनी असभ्य भाषा वापरल्याचे दिसते. या व्हिडिओमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बोर्डीकर विरोधक आणि समर्थकांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्‍यता निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनाच पळापळ करत हा चार वर्षापुर्वीचा व्हिडिओ असल्याचा खुलासा करावा लागला. 

बोर्डीकर हे कॉंग्रेसमध्ये असतांना 2014 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढण्यात आला होता. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले होते. तेव्हा मोर्चेकरांच्या गाड्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्यांना जिंतूर रस्त्यावरील एका जागेत वाहनतळ दिले होते. 

त्या वाहनतळावर काही गाड्यांवर दगडफेक झाल्याची अफवा सभेच्या ठिकाणी पसरली. त्यामुळे संतापलेल्या बोर्डीकरांनी भाषणातूनच पोलिसांना उद्देशून असभ्य भाषा वापरली होती. यावेळी माजी आमदार कुंडलीकराव नागरे, आनंद भरोसे, मेघना साकोरे-बोर्डीकर या वेळी उपस्थित असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते. बोर्डीकरांनी वापरलेले शब्द इतके असभ्य होते की तो व्हिडीओ पाहिल्यानंतर राग उफाळून येणे स्वाभाविक होते. खुद्द पोलिसांना असे शब्द वापरूनही त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहणाऱ्याला पडतो. राज्यभर हा व्हिडीओ फिरला. 

त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थीती निर्माण झाल्यावर अखेर पोलिसांनीच या जुन्या व्हिडिओचे "व्हायरल' सत्य समोर आणले. त्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातूनच एक मेसेज पाठवत हा जुना व्हिडिओ परत कोणीही सोशल मिडियावर व्हायरल करू नये. तसे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा दम पोलिसांनी भरला आहे. या व्हिडीओ प्रकरणी बोर्डीकर यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांनी या मेसेजमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढलेल्या बोर्डीकरांचा पराभव झाल्यानंतर वर्षभरापुर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर परभणी जिल्हा बॅंकेचे ते अध्यक्ष असतांना झालेल्या विमा घोटाळा प्रकरणात जिल्हा न्यायलयाने त्यांना दोषी ठरवत परभणी शहरात येण्यास बंदीदेखील केली होती. दीड महिन्यापुर्वीच ती उठवण्यात आली. तेव्हा बोर्डीकरांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. आता चार वर्षापूर्वीच्या या व्हिडिओमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com