Booth Committees are Tool to win Elections | Sarkarnama

'राष्ट्रवादी'च्या सारंग पाटील यांनी दिल्या निवडणूक जिंकण्याच्या टिप्स! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ कमिट्या प्रशिक्षण शिबीर राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी पाटील यांनी निवडणुका जिंकण्याचे तंत्र पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्यांनी अनेक टिप्स दिल्या.

नाशिक : ''बूथ कमिट्या हे काँग्रेसचे बलस्थान होते. गावातले जाणते लोक या कमिट्यांत राबायचे. म्हणुन काँग्रेस निवडणुका जिंकत होती. आपले हे कौशल्य आता इतर पक्षांनी आत्मसात केले अन्‌ आपण मात्र विसरलो. तेव्हा जागरुक व्हा अन्‌ बुथ कमिट्या करा. बुथ प्रमुख हा निवडणूक जिंकून देणारा हुकमी एक्का आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील यांनी सांगितले. 

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ कमिट्या प्रशिक्षण शिबीर राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी पाटील यांनी निवडणुका जिंकण्याचे तंत्र पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्यांनी अनेक टिप्स दिल्या. ते म्हणाले, "तुम्ही आमदार असा वा कितीही मोठे पदाधिकारी; बुथ कमिटीत काम करणे कमीपणाचे समजू नका. तशी चुक करणे तुम्हाला नुकसानदायक ठरेल,"

ते पुढे म्हणाले, "एका बुथवर हजार मतदार असतात. बूथ प्रमुखासह दहा जणांची समिती तेथे करा. यात एकाने शंभर मतदार म्हणजे वीस घरे सांभाळावी. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे. रोज संपर्क करावा. निवडणुकीत त्यांना आपला पक्ष व उमेदवार सांगावा. यातील चाळीस टक्के म्हणजे फक्त चाळीस जणांनी तुम्हाला मतदान केले तरी तुम्ही निवडणुक जिंकता. पूर्वी काँग्रेस पक्षात जाणते लोक बूथ कमिटीत काम करीत. ते मतदार यादी घेऊन बसत. प्रत्येक मतदारांची छाननी करीत. त्यामुळे काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकणारे मशीन होते. तो सुवर्णकाळ आठवा व काम करा. आपल्या पक्षाला निश्‍चितच चांगला भविष्यकाळ असेल." 

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, डॉ.भारती पवार, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, माजी आमदार दिलीप बनकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार कदम, डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख