सोमनाथ चॅटर्जी.. ‘लाल मातीर’ देशातला ‘लोकशाहीवादी’ दादा..!

सोमनाथ चॅटर्जी.. अर्थात ‘सोमनाथदा’ ... यांच्या निधनाने भारतीय संसदीय क्षेत्रातला एक बुजुर्ग नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
Somnath-Chattarjee
Somnath-Chattarjee

सोमनाथ चॅटर्जी.. अर्थात ‘सोमनाथदा’ ... यांच्या निधनाने भारतीय संसदीय क्षेत्रातला एक बुजुर्ग नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.  डाव्या चळवळीचं बाळकडू घेतलेलं असतानाही कट्टर ‘लोकशाहीवादी’ असं हे व्यक्तिमंत्व. बोलपुर या लोकसभा मतदारसंघाचं दहा वेळा प्रतिनिधित्व करणारे सोमदानदा यांचं तिथल्या जनतेतं एक अतुट नातं होतं. शांतिनिकेतनचं जुळं शहर म्हणजे बोलपूर.  पण दादाचं वास्तव्य शांतिनिकेतनच्या बाजूलाच असलेल्या बुध्दीवंत व प्रज्ञावंत शास्रज्ञांच्या सोसायटीत होतं. 

2011 च्या बंगाल विधानसभेचं वार्तांकन करण्यासाठी गेलो असताना सोमनाथदाला भेटण्याचा योग आला. मनमोहन सरकारनं अमेरिकन सरकार सोबत अणुकरार केला त्यावेळी सोमनाथदा लोकसभेचे अध्यक्ष होते. डाव्या पक्षांनी मनमोहन सरकारचा पाठिंबा काढला होता. सोमनाथदा यांनी पण लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावं असा पाॅलिटब्युरोचा निर्णय होता. पण लोकसभा अध्यक्षपद हे कोणत्या एका पक्षाचं नाही. ते राजकिय निरपेक्ष पद असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला नव्हता. 

त्यानंतर झालेल्या पक्षांतर्गत मतभेदातून सोमनाथदा यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. 2009 च्या निवडणूकांनंतर ते त्यांच्या शांतिनिकेतनच्या घरात अगदी एकटेपणानं राहत होते. त्यातच 2011ला बंगाल मधे डाव्या पक्षाच्या 35 वर्षाच्या सलग व एकहाती सत्तेला ममता बॅनर्जी च्या तृणमुल काॅग्रेसंन मोठं कडवं आव्हान उभं केलं  होतं. अशा काळात आयुष्यभर डाव्या विचारांची सोबत करणारे सोमनाथदा स्वस्थ कसे बसू शकतात  ? यासाठी त्यांना भेटायचं ठरवलं.

एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व व देशाच्या राजकारणातील प्रत्येक क्षणाचे साक्षीदार  म्हणून त्यांच्या भेटीची आतुरता होतीच. पण करारी स्वभाव, त्यात पत्रकारितेतला जेमतेम पाच सहा वर्षाचा अनुभव व ‘सकाळ’ या मराठीतल्या प्रादेशिक दैनिकाचा मी प्रतिनिधी... सोमनथदा भेटतील काय ? बोलतील काय ?की  त्यांच्या  करारी स्वभावानं पिटाळून लावतील काय ? अशा शंकांचं काहूर मनात होतचं... पण सोमनाथदाला भेटायचचं असा पक्का विचारही होतां.

सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या सोसायटीच्या वाॅचमनकडे व्हिजिटींग कार्ड पाठवले व त्यावर लिहीले ‘ दादा सिर्फ दो  मिनीट मिलना हैं ‘ ....!!

वाॅचमन परत आला .  ‘तुम्हारा कार्ड देखकर ये महाराष्ट्र  का आदमी दो मिनीट मिलकर क्या करना चाहता है वो देखना है... बुला लो‘ असे  सोमनाथदांचे फर्मान असल्याचे त्याने सांगितले 

मी आनंदाने  आंत गेलो. दादांचा एक सचिव व दादा अशी दोनचं माणसं घरात. पण भलं मोठं घर व त्या घरात सगळी जागा, दरवाजे, भिंती केवळ सोमनाथदांचे फोटो, पारितोषिकं, सन्मान चिंन्हांनी मढलेल्या होत्या... दादांच्या राजकिय प्रगल्भता व अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देत होत्या त्या भिंती...!

दहा मिनीटं वाट पाहिल्यानंतर दादांनी आतं बोलावलं.... भारतीय राजकारणातल्या एका बुजूर्ग नेत्याला भेटत होतो याचा मनोमन आनंद होता. पण बाहेरून दिसणारं भारदस्त राजकिय व्यक्तिमत्व जवळगेल्यानंतर मात्र सहजता व सुलभतेनं किती परिपक्व आहे याचा अनुभवआला. 

‘ दादा मै महाराष्ट्रसे हूं.. आपका इन्टरव्हू करना चाहता हूॅं...’

किसको इन्ट्रेस्ट है महाराष्ट्र मे बेंगाल के इलेक्शनमे ?  त्यांचा सरळप्रश्न...

मी महाराष्ट्र व बेंगालचं स्वातंत्र्य  चळवळीपासून असलेलं भावनिक नातं सांगायचा प्रयत्न केला.

‘ मै इन्टरव्हू तो नही दे सकता. मुझे पार्टीसे निकाल दिया है. मै किसी भी पार्टी का नही हूं. मै तो एक सामान्य आदमी हूं. ‘  भरल्या आवाजात त्यांनी थोड्या चढ्या आवाजातचं सुनावलं.

‘ लेकिन दादा आप  बचपन से ही बंगाल की एवं देश की राजनिती नजदिकसे देखी है. और आपकी कम्युनिस्ट पार्टी एकविचारधारा से जुटी पार्टी है. 

जिस बंगाल मे इस ग्लोबलायझेशन मे भी इस पार्टी की सरकार जनता चुनती है . लेकिन इस बार कम्युनिस्ट की सरकार पहिली बार टेन्शन मे दिख रही है. क्या कारण है वह देश की सामान्य जनता और विश्लेषक जानना  चाहते है ... ‘ मी सरळ थेटचं न थांबता बोललो.

.. ‘ कहां कहा घुमे हो बंगाल मे ? त्यांचा सरळ प्रश्न... मी ज्या ज्या भागात फिरलो होतो त्या त्या शहरांची व गावांची नावे घेत गेलो... सोमनाथ यांनी कुणाकुणाला भेटलास असे विचारले... मी तृणमलच्या व कम्युनिस्टांच्या जिल्हास्तरिय नेत्यांची नावं सांगितली... 

दादांच्या चेहर्यावर हसरे भाव होतें. एकेक नावं ऐकताना ते मधेच म्हणाले ‘ अकेले घुम रहे हो... गाडी है क्या आपके पास ?

मी नाही म्हणालो. बस नं फिरतोयं हे सांगितल्यानंतर दादांना कौतुक वाटले. 

‘ बेटा मै बोल सकता हूं लेकिन इन्टरव्हू नही दे सकता. बहुत सारे चॅनेल के लोग आकर गये हैं. मैने मना कर दिया है’ त्यांनी निर्णय सांगावा त्या धाटणीत उत्तर दिलं. 

पण मी थोडासा आणखीन प्रयत्न म्हणून ‘ दादा आपको ऐसा नही लगता की आप जिस पार्टीके साथ जिंदगीभर जुडे है उस पार्टी के लिए कुछ तो बोलना चाहिए ? 

यानंतर सोमनाथ दा एकदम स्तब्ध झालें. 

अगदी भावुक स्वरात ते म्हणाले ‘, हां... लगता तो है. मै मेरे चुनाव क्षेत्र के लोगों को अपिल करूंगा.. व्होट फाॅर सीपीएम...!! 

मी न थांबता ‘ कैसे करोगे... ? रॅली करोंगे या क्या ...? 

‘ नही मै तो पार्टी के मंच पर नही जा सकता. पार्टी ने मुझे निकाल दिया है. मै एक अपिल लेटर निका लूंगा... और यह सिर्फ बोलपूर के लिएही मर्यादित होगा..’ 

या सर्व संभाषणातून सोमनाथदा राजकिय शिष्टाचार व लोकशाहीवाद याबाबत किती परिपक्व होते ते जाणवले. पक्षानं काही मतभेदांसाठी त्यांची हकालपट्टी केलेली असली तरीआयुष्यभर त्यांनी पक्षनिष्ठा ढळू दिली नाही. त्यानंतर मी सकाळ मधे एक मुलाखतवजा बातमी लिहीली होती ..‘ एकांतात तळमळतोय डाव्यांचा भिष्माचार्य...!’ 

दुसर्याच दिवशी सोमनाथ दा यांनी जनतेला अपिल करणारं पत्रक काढलं ... अन राष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज झाली. त्यानंतर डाव्या पक्षाचे सर्व नेते त्यांना भेटयला धावले. मतभेद विसरले.सोमनाथदा प्रचारात सक्रिय झाले. पहिलीच सभा त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री बुध्ददेवभट्टाचार्य यांच्या जाधोवपुर मतदार संघात घेतली. 

‘लाल मतिर देश’ म्हणून ज्या बोलपुरची ओळख आहे. त्या बोलपुर मधल्या शांतिनिकेतन परिसरात ‘लाल सलाम व लाल निषाण’ यासाठी आयुष्यभर लढणार्या पण आयुष्याच्या उत्तरार्धात अबोल झालेल्या या महान लोकशाहीवादी डाव्या नेत्याला बोलतं केल्याचं समाधान पत्रकारितेतली एक ‘शिदोरी’ म्हणून कायम सोबत राहिलचं...

सोमनाथदा भावपुर्ण श्रध्दांजली...!!! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com