"पप्पू' राहुलना भाजप इतके "सिरियस' का घेते ? 

ज्या भाजपला राहुल गांधी पप्पू वाटतात. त्याच राहुलना आज भाजप इतके सिरीयस का घेत आहे ? त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर देण्यासाठी भाजपचे डझनभर मंत्री का पुढे येत आहे. आज देशाचा विचार केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणाची चिरफाड करणारा दुसरा नेता देशात नाही.
"पप्पू' राहुलना भाजप इतके "सिरियस' का घेते ? 

" अगर तुम गलत रास्ते पर चलोगे, तो हो सकता है 
शुरुआत में तुम्हे बहुत कामयाबी मिले, बहुत खुशियॉं. 
अंत में तुम्हारी हार होगी.. 
और अगर तुम सही रास्ते पर चलोगे , 
तो भले ही शुरुआत में तुम्हे कदम कदम पर ठोकरें मिलें. 
का सामना करना पड़े. मगर अंत में हमेशा तुम्हारी जीत होगी.'' 

हा डायलॉग आहे दिलवाले दुल्हनियॉं चित्रपटातील. या सहा ओळी खरंतर अंतर्मुख करणाऱ्या आहेत. हो ! प्रत्येक राजकारण्यांसाठी. राज्यकर्त्यांच्या आयुष्यात कधी यश तर कधी पराजय वाटेला येतो. जयपराजय पचविण्याची ताकद त्यांच्यात येते कुठून असा प्रश्‍न मनाला सतावत असतो. 

अनेक उन्हाळेपावसाळे पाहिलेले नेते वादळातही स्थितप्रज्ञ राहून फिनिक्‍स पक्षाप्रमाणे पुन्हा उंच झेप घेतात. त्यांना यश मिळते. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबतही असेच म्हणता येईल. त्यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्या वाटेला पराभव, अपयश, निंदानालस्ती, हेटाळणी आदी म्हणून जे काही आरोप व्हायचे ते झाले. काही ठोस सापडेना म्हणून त्यांच्या लग्नाच्या कंड्या पिकविल्या. सोशल मीडियावर टिंगलटवाळी तर नित्याचीच. मात्र या गर्व गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहणारा भारतीय राजकारणातील हा नेता कधी डगमगला नाही आणि भाजपच्या हेटाळणीला त्यांनी कधी भीकही घातली नाही. हे कटुसत्य आहे. 

खूप मागे न जाता 2014 पासूनच्या राजकारणावर म्हणजेच गेल्या चार वर्षातील घडामोडींवर एक दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येते की, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सक्रिय राजकारणातून जवळपास निवृत्तच झाल्या आहेत. प्रियांका गांधी संसारात मग्न आहेत. चार वर्षापूर्वी राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाला.

लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पालापाचोळ्यासारखी उडून गेली. कॉंग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा खुद्द मोदींनी उचलला. एकीकडे कॉंग्रेसला लक्ष्य करतानाच दुसरीकडे प्रादेशिक पक्षांचेही होता होईल तितके खच्चीकरण सुरू होते. भारतात फक्त कमळ फुलले पाहिजे इतर फुले नको हा जो निर्धार करण्यात आला त्याला खरा पायबंद घालण्यास सुरवात राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी केली. 

बलाढ्य अशा भाजपला विरोध करणे सोपे नाही हे राहुल गांधींना ठाऊक नव्हते का ? या विरोधाची किंमत मोजावी लागेल. तुरुंगात जावे लागेल. हे माहीत असतानाही ते गेली चारवर्षे लढत आहेत. थेट मोदींनाच शिंगावर घेता आहेत. 

च्या एकूनच राजकारणाला कॉंग्रेसचा विरोध आहे. या पक्षाची जी म्हणून काही ध्येयधोरणे आहेत त्यापासून पक्ष एक इंचही बाजूला हटणार नाही हे राहुल यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. भले कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल ही त्यांचेच वाक्‍य आहे. 

धर्मनिरपेक्षतेची त्यांनी कधी तडजोड केली नाही. ते पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहांशी दोन हात करताना दिसतात. प्रत्येक निवडणुकीत ते भाजपविरोधात मैदानात उतरतात. भाजपच्या डावपेचासमोर त्यांना अनेकदा पराभूत  व्हावे लागले. मोदींशी ते लढूच शकत नाहीत. मोदी हे हिमालयासारखे व्यक्तिमत्त्व आहे याची आठवण भक्तांनी नेहमीच त्यांना करून दिली. मात्र त्यांनी यासर्व टीकेला आणि निंदानालस्तीकडे दुर्लक्ष करून मोदी हेच आपले लक्ष्य असल्याचे दाखवून दिले. 

पंजाब आणि एकदोन राज्य वगळता कॉंग्रेसने देशभर सपाटून मार खाल्यानंतर राहुल यांचा रडका चेहरा दाखवून ते राजकारणात संपले आहेत असे चित्र निर्माण केले गेले. गुजरातमध्ये जेव्हा भाजपला कसेबसे यश मिळाले तेव्हा भाजपवाले जमिनीवर आले. कर्नाटक आणि गुजरातमध्ये जर भाजपने बहुमत घेतले असते तर आज 2019 ची तयारी धुमधडाक्‍यात सुरू केली असती.

गुजरातमध्ये भाजप विजयी झाली असली तरी तेथे पक्षाचा नैतिक पराभव झालेला होता. कर्नाटकात आज भाजपच्या फोडाफोडीला कॉंग्रेसनेच रोखले आहे. हे यश कॉंग्रेसचे आहे. कुमारस्वामींचे नाही. कोर्टकचेऱ्या आणि राष्ट्रीयस्तरावर भाजपशी फक्त कॉंग्रेसच मुकाबला करू शकते. कारण कॉंग्रेस संपलेली नाही तर त्यांच्याकडे नेटवर्क आहे. थिंक टॅंक आहे. ज्या पक्षाला शंभर वर्षाचा इतिहास आहे तो चारपाच वर्षात संपणार नाही हे मोदींच्या कट्टर भक्तांना सांगणार कोण ? 

येथे सर्वांत महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा असा आहे की, ज्या भाजपला राहुल पप्पू आहे असे वाटते.तर त्याच राहुलना आज भाजप इतके सिरीयस का घेत आहे ? त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर देण्यासाठी भाजपचे डझन दोन डझन मंत्री आणि नेते का पुढे येत आहे. राहुल बोलले रे बोलले की भाजप मंत्री आलेच स्टुडिओत.

मोदी हेच आपले टार्गेट आहेत हे राहुल यांनी स्पष्ट केले आहे. आज देशाचा विचार केल्यास मोदींच्या राजकारणाची चिरफाड करणारा दुसरा नेता देशात नाही. मोदींना ते आव्हान देत आहेत. दररोज प्रश्‍न करतात. राहुल गांधींची निंदा करून भाजपनेच त्यांना मोठे केले. ते पूर्वीचे राहुल राहिले नाहीत. त्यांच्या भाषणात, टीकेत जोरकसपणा आला आहे. शेराला सव्वाशेर भेटत चालला आहे हे मात्र खरे. 

आज कर्नाटकात कॉंग्रेस जेडीयूची सत्ता आली आहे. उद्या राहील किंवा जाईलही पण, राहुल गांधी हे भाजपविरोधात कायम रणांगणात दिसतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते आज क्रॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कुठे आणि कधी आघाडी करायची याचा निर्णय ते स्वत: घेत आहेत. काहीवेळा नमते घेतात.

प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत आहेत. कॉंग्रेसच्या मागे प्रादेशिक पक्षांची ताकद भविष्यात ते उभी करू शकतात. जे म्हणून धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांना बरोबर घेतील असे दिसते. काही असो जयपराजयाची चिंता न करता राहुल गांधी लढता आहेत हे स्वागतार्ह आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com