भाजपच्या फुगलेल्या बेडकांना गडकरींनी बरे झाले टाचणी लावली! 

भाजपच्या फुगलेल्या बेडकांना गडकरींनी बरे झाले टाचणी लावली! 

भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार आणि आमदार हे निव्वळ मोदी लाटेवर निवडून आले. मात्र हे वास्तव त्यांच्या आता पचनी पडत नाही. आपणच लोकनेते आहोत, असा भ्रम त्यांना झालेला आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनीच याबाबत उघड सत्य बोलून दाखवले आहे. त्यामुळे अशा `लोकनेत्यांनी` वेळीच सावध व्हावे!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे अघळपघळ माणूस. पोटात एक आणि ओठावर दुसरे असं त्यांच नसतचं. जे काही आहे ते समोरासमोर आणि रोखठोक. जसा शरद पवारांबद्दल इतर पक्षांतील नेत्यांना आदर असतो. तसाच आदर गडकरींबद्दल इतर पक्षांतील नेत्यांना असतो. फटकळ आणि स्पष्ट असलेल्या गडकरी यांनी पवार यांच्या मराठवाड्यातील सत्कारात बोलताना दोन-तीन नोंदविलेली निरीक्षणे टोकदार आहेत. त्यांच्या वाक्‍यात इतका टोकदारपणा आहे की त्यामुळे काहींचे फुगलेले बेडूक जरा जाग्यावर येतील. 

पवार यांचे कौतुक करताना त्यांनी भाजपबद्दल निरीक्षण नोंदविले. ते म्हणले, ""कॉंग्रेस आणि आमच्या पक्षात (भाजप) जे ग्रामपंचायतवर निवडून नाही येत, ते लोकसभेवर निवडून येतात. कारण आमचा पक्ष हवेवर चालतो.'' त्यांच्या या वाक्‍यावर सारेच आश्‍चर्यचकीत झाले. त्यावर गडकरी पुन्हा म्हणाले की खरं आहे हे! गडकरी हे भाजपचे अध्यक्ष होते. त्यामुळे निवडून आलेल्या कोणाची काय पात्रता आहे, याची त्यांना नक्कीच चांगली माहिती असणार. म्हणूनच त्यांनी हे विधान केले असावे. 

देशात 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज पराभूत झाले. भाजपच्या किरकोळ समजल्या जाणाऱ्या उमेदवारांकडून ही मंडळू पराभूत झाली. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीतही घडला. भाजपकडून पहिल्यांदा आमदार झालेल्यांना कसलाच राजकीय अनुभव नव्हता. तरीही त्यांनी मोदी लाटेवर विजय मिळवला. बरे ही मंडळी मोठ्या मताधिक्‍याने निवडून आली. परिणामी त्यांना असे वाटत होते की केवळ आपल्या प्रतिमेमुळे, निवडणुकीत आपण घेतलेल्या कष्टामुळे आणि आपल्या लोकप्रियतेमुळे आपण संसदेत किंवा विधानसभनात पोचलो. यानंतरच्या बहुतेक निवडणुकांत भाजपचा जोर कायम राहिला. त्यामुळे या नेत्यांमध्ये आणखी हवा भरली गेली. त्यांचा "बेडूक' सध्या इतका फुगला आहे की या मतदारसंघाला आपल्याशिवाय आणि भाजपलाही माझ्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचे वाटू लागले आहे. नेत्यांच्या स्वतःबद्दलच्या गैरसमजामुळे त्यांचे वागणे बिघडले आहे. 

मोदींच्या चेहऱ्याशिवाय ही मंडळी निवडून आली नसती. मात्र याचा विसर पडल्याने पुण्यातील एका आमदाराने आपल्या वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवर मोदींचा सुद्धा फोटो लावला नाही. केवळ त्या आमदाराचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाच फ्लेक्‍सवर फोटो! इतका या आमदाराला स्वतःबद्दल आत्मविश्‍वास वाटत आहे. बरे एकदा संसदेत किंवा विधानसभेत जायची संधी मिळाल्यानंतर तेथे अभ्यास करावा, मतदारसंघाचे प्रश्‍न मांडावेत, असेही नाही. चांगली, मुद्देसूद भाषणे ऐकण्याची संधी सभागृहात मिळते. तर एवढेही करणे या खासदार किंवा आमदारांच्या जिवावर येते.

एका तरुण भाजप आमदाराला विधानसभेच्या अधिवेशनात मुंबईत कसे वाटते, असा प्रश्‍न विचारला होता. ""इकडेच बरे वाटते. मतदारसंघात असलो की लोक वैतागून सोडतात. त्यापेक्षा अधिवेशनात आहे, असे उत्तर दिले की काम भागते,'' असे त्याने सांगितले. बरे अधिवेशनातही फार काही करतात असेही नाही. सभागृहात उपस्थित राहायचाही या मंडळींना कंटाळा येतो. कोणत्या प्रश्‍नावर विधिमंडळात आवाज उठविला किंवा कोणत्या मुद्यावर चांगले भाषण केले, असा प्रश्‍न भाजपच्या आमदारांना विचारला की त्यांचे उत्तर ठरलेले असते. "अहो, सत्ताधारी असल्याने आम्हाला फार प्रश्‍न विचारता येत नाही किंवा आम्हाला वेळच मिळत नाही,'असे ही मंडळी सांगतात. 

राज्यसभेसारख्या ज्येष्ठ मंडळींच्या सभागृहात भाजपचे खासदार उपस्थित राहत नाही. त्याबद्दल खुद्द मोदींना चिंता व्यक्त करावी लागली. लोकसभेत तर बहुतांश नवख्यांचाच भरणा. तेथेही मंडळी दांडी मारण्यालाच प्राधान्य देतात. विधिमंडळातील ग्रंथालयात नवीन आमदार किती जण येतात, याचे उत्तर विचारले तर जवळपास शून्यच येईल. नारायण राणे यांच्यासारखा नेता या ग्रंथालयात अनेकदा येतो, हे नव्या आमदारांच्या गावीही नाही. भाजपचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असूनही त्यांनी जोरकसकपणे सरकारची बाजू मांडली, असेही दिसत नाही. नव्या खासदारांचा पराक्रम कोठे? तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनमध्ये मला चांगली वागणूक मिळाली नाही, अशा तक्रारी करण्यातच यांचा पराक्रम. 

अर्थात सारेच नवीन खासदार किंवा आमदार असे वागतात असे नाही. मात्र गडकरींनी योग्य वेळी कान टोचले आहेत. दर वेळी मोदी लाट तारून नेईल, अशी स्थिती नसते. नेत्यांनाही आपला स्थानिक प्रभाव दाखवावा लागतो. अन्यथा एखादी लाट जशी निवडून आणू शकते तसेच विरोधी लाट राजकीय करियर सपाटही करू शकते, याचे भान ठेवायलाच हवे. गडकरींच्या या वक्तव्यावर "फुगलेले बेडूक' विचार करतील का? 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com