महाराष्ट्रात "खिचडी' अशक्‍य

महाराष्ट्रात "खिचडी' अशक्‍य

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन वर्षात आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे जे बिहारमध्ये घडले तसे महाराष्ट्रात काही घडेल असे वाटत नाही. आज जे काही मनोरंजन सुरू आहे. ते आणखी दोन वर्षे तसेच चालत राहिल. भाजपचा पाठिंबा काढून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली इतर पक्षाचे खिचडी सरकार सत्तेवर येण्याची शक्‍यताही दुरापास्त वाटते.

बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्रात तसे होईल का ? याचा आता फक्त विचारच केलेला बरा. बिहार म्हणजे महाराष्ट्र नाही. तेथील पुढाऱ्यांसारखे आपल्या पुढाऱ्यांचे नक्कीच आचरणही नाही. हे मराठी माणसाचे भाग्यच म्हणायला हवे. राजकारणात शह काटशह चालतात. त्यामध्ये गैर असे काही नाही. कोणी कोणाला पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असला तरी अगदी टोकाची भूमिका घेणारे पक्ष आणि त्यांचे नेते ही येथे नाहीत. त्यामुळे भाजपचा पाठिंबा काढून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली इतर पक्षाचे खिचडी सरकार सत्तेवर येण्याची शक्‍यताही दुरापास्त वाटते. मग चंद्रकांतदादा, अजितदादा, उद्धवजी किंवा त्यांचे प्रवक्ते कम खासदार कितीही सत्ता पालटाच्या गप्पा मारोत. 

ष्ट्रात फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. राहतात फक्त दोन वर्षे. ही दोन वर्षेही शिवसेना फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेईल असे स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन वर्षात आपली पकड इतकी मजबूत केली आहे की दिल्लीतील त्यांची पक्षश्रेष्ठीही त्यांच्याविषयी दहावेळा विचार करेल. विधानसभेनंतर राष्ट्रपतीपदापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने यश खेचून आणले आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही. अधेमध्ये त्यांच्याविषयी वावड्या उठविल्या जातात. परंतु त्यामध्ये काही तथ्य आहे असे वाटत नाही. फडणवीस यांनी विरोधकांना जसे चारीमुंड्याचित केले आहे. तशी पक्षांतर्गत पकडही मजबूत केली. शिवसेना तर दररोज पाठिंबा काढून घेऊ का ? असे धमकावते, इशारे देते, डेडलाइन देते. पण फडणवीस काही त्यांची गंभीरपणे दखल घेता आहेत असेही दिसून आले नाही. त्यामुळे सरकारला धोका वैगेरे काही असे तरी सध्या दिसत नाही. 

बिहारमध्ये नितीशकुमारांनी भ्रष्ट लालूंची संगत सोडून स्वच्छ, सुसंस्कृत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकंदर लालूंची आणि त्यांच्या पक्षाची जी प्रतिमा आहे त्याविषयी विचार केल्यास नितीशकुमार योग्यच वाटतात. मग त्यांचे भाईसाथी त्यांना कितीही शिव्याशाप देवोत. 
ष्ट्रात मात्र तसे चित्र नाही. शिवसेनेने भाजपची साथ सोडली तर त्यांना लोकांच्या दरबारात कारणेही द्यावी लागतील. फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा क्‍लिनच आहे. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचारी आहे. येथे जंगलराज सुरू आहे. सरकार न्यायच देत नाही अशी कारणे सांगून ते साथ सोडू शकत नाही. जरी सोडली तरी फडणवीस सरकारला कोणाताही धोका निर्माण होईल असे वाटत नाही. अल्पमतातील सरकार आणखी दोन वर्षे कसेही कारभार चालवू शकते. 

सरकारचा पाठिंबा जर शिवसेनेने काढून घेतला तर कॉंग्रेस सत्तेसाठी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाला पाठिंबा देईल असेही वाटत नाही. शेवटी कॉंग्रेसला एखाद्या राज्याचा विचार करून चालणारही नाही. कॉंग्रेसची सेक्‍यूलर म्हणून ही जी काही प्रतिमा आहे तिला तडा जावू शकते. मुळातच कॉंग्रेस कधी नव्हे इतकी अडचणीत असताना आपल्या तत्वाला कशासाठी मुरड घालेला हा प्रश्‍नही उरतोच . कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्याविषयी कोणी काहीही म्हणो. पण, त्यांनी एक गोष्ट मात्र ठणकावून सांगितली आहे, की कॉंग्रेसची जी काही ध्येयधोरणे आहेत. त्याबाबत तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी आम्हाला आणखी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. त्यामुळे हिंदुत्त्वाचा ज्वलंत पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेबरोबर कॉंग्रेस जाईल असे वाटत नाही. शिवसेनेला ती बाहेरूनही पाठिंबा देऊ शकत नाही हे सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. कदाचित याच गणितांचा विचार चंद्रकांतदादानी केलेला असावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा शिवसेनेला किती साथ देतील हा प्रष्न असला तरी ते शिवसेनेला उचकवित आहेत. ते शिवसेनेलाच लक्ष्य करीत आहेत. हे जरी खरे असले तरी उद्धव ठाकरे हे शांत संयमी आहेत. ते चारही बाजूने विचार करूनच निर्णय घेतील. राष्ट्रवादीच्या भरवशावर भाजपबरोबर पंगा घेण्याची शक्‍यता नाही. सत्तेत राहून ते भाजपची प्रतिमा जितकी म्हणून कलंकित करता येईल तितके ते करीत राहणार. आगामी निवडणुकीतही भाजप आपल्याला बरोबर घेणार नाही हे त्यांना पक्के माहित असावे. भाजपला बहुमत कसे मिळणार नाही याची गणित ते मांडत असावेत. 

जर पाठिंबा काढून घेतला तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे आमदार त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहू शकतील का ? आज गुजरातमध्ये कॉंग्रेसचे काय चालले आहे हे आपण पाहतो आहोतच. आहे त्या कपड्यावर त्यांना घराबाहेर काढले जात आहे. दुसऱ्या राज्यात नेवून ठेवले जात आहे. कोण कधी फुटेल याचाच भरवसा राहिला नाही. सत्तेसाठी आणि मालामाल होण्याची संधी आज कोणीही सोडण्यास तयार नाहीत. पक्ष, निष्ठा या फक्त जाहीर भाषणापुरत्या बऱ्या वाटतात. "पुढचे कोणी पाहिले आज मिळतंय ना ! घ्या हात मारून' हाच विचार बहुतांशी नेत्यांच्या मनात असतो. त्यामुळे सत्तेला भुलले चेहरेच मोठ्या संख्येने दिसून येतात. 

एकेकाळी कॉंग्रेसने फोडाफोडीचे जे राजकारण केले किंवा जे विष पेरून ठेवले आहे. त्याचे परिणाम कॉंग्रेस आज भोगत आहेत. भाजपने फोडाफोडीा केली की ते लोकशाहीचा खून पाडला म्हणणार. कॉंग्रेसने मात्र आतापर्यंत लोकशाहीचा कितीवेळा खून केला याचे मोजमाप नाही. आज भाजपही कॉंग्रेसप्रमाणे फोडाफोडीत पारंगत झाला आहे. कॉंग्रेसकडून जर भाजपने काही घेतले तर हेच. उद्या महाराष्ट्रात जर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे जादूची कांडी दिल्लीहून घेऊन येतील. तेथे ठाण मांडतील. एका रात्रीत असा काही खेळ करतील की पाठिंबा होता तेच बरे होते असे म्हणून भल्याभल्यांना माथ्याला हात लावून बसण्याची वेळ येईल. 
सोशन मिडीयावर व्हायरल झालेला दोन विनोद यानिमित्ताने आठवले. 

पहिला विनोद 

""अल्प मत हो या बहुमत 
निराश न हो ! 
देश और दुनिया में कही भी सरकार बनाने के लिए संपर्क करे''
 
-डॉ. अमित शाह गुजरातवाले. 
......... 
दुसरा विनोद आहे 

नवाज शरीफ रिझाइन ऍज पीएम ऑफ पाकिस्तान 
नरेंद्र मोदी आस्क अमित शाह टू गो टू इस्लामाबाद 
ऍन्ड एक्‍स्पोलर दी पॉसिबल ऑफ ए बीजेपी 
गोव्हरमेंट देअर ! 

सोशल मिडीयावरील हे दोन विनोद असले तरी महाराष्ट्रातील भाजप सरकारविरोधकांना ते अस्वस्थ करणारे आहेत. त्यामुळे जे बिहारमध्ये घडले आहे. तसे महाराष्ट्रात काही घडेल असे वाटत नाही. आज जे काही मनोरंजन सुरू आहे. ते आणखी दोन वर्षे तसेच चालत राहिल. यामध्ये काही फरक पडेल असे वाटत नाही.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com