"शिवसेना शेर तर राष्ट्रवादी सव्वाशेर'

"शिवसेना शेर तर राष्ट्रवादी सव्वाशेर'

थोर तमाशा कलावंत काळूबाळूंची जी वगनाट्ये गाजली त्यापैकी "शेराला भेटला सव्वाशेर' हे एक. राजकारणातील शिवसेनेसारख्या शेराला राष्ट्रवादी सव्वाशेर म्हणून भेटली आहे. कॉंग्रेसविषयी तर काही बोलायलाच नको. ती फुटीच्या विळख्यात सापडली आहे. राजकारण म्हणजे तमाशाचा फडच बनला आहे. लोकांचे मनोरंजन सुरू आहे.

सांगली जिल्ह्यातील कवलापूर हे बॅरिस्टरांच गाव म्हणून ओळखलं जातं. तसंच ते काळू-बाळूंच्या नावानंही ओळखलं जातं. या गावाने जसे थोर तमाशा सम्राट दिले तसे बॅरिस्टरही दिले. त्यामुळे गावाची किर्ती जगभर पसरली. काळू-बाळू यांच्या तमाशाने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यामुळे काळूबाळूच्या नावाने कवलापूरची ओळख साऱ्या जगाला झाली. 

या दोन जुळ्या भावांचा तमाशा असला की लोक इतकी गर्दी करीत की काही विचारू नका. हे दोघेही कसलेले नटसम्राट. ते असा अभिनय करीत की समोरच्या प्रेक्षकांचे हसून हसून कधी पोट दुखत असे तर कधी असे प्रसंग उभे केले जात की मन हेलावून जाई. डोळ्याच्या कडा पाण्याने भरल्या जात. या दोन भावानी तमाशात राजकारणही गाजविले. आपल्या हजरजवाबीने त्यांनी राज्यकर्त्यांनवर कधी कोटी केली तर कधी फटकारले. काय टायमिंग सांधायची ही जोडी. "जहरीप्याला' या वगनाट्याने तर प्रत्येकाला वेड लावले. आजही "जहरीप्याला' पुन्हा पुन्हा पाहावा वाटतो. काळूबाळू या भावानी तमाशा कलावंताना सरकारी दरबारी न्याय मिळवून दिला. केवळ सरकारच्या मदतीवर न थांबता त्यांनी प्रथम आपल्या खिशात हात घातला. गोरगरिबांना कसा न्याय मिळेल याचा नेहमीच विचार केला. राज्यातील शेकडो संस्थांना मदतीचा हात पुढे केला. पण, कधीही गाजावाजा केला नाही. तमाशाचा फड जोमात असतानाही त्यांच्या डोक्‍यात कधी हवा गेली नाही. नेहमीच त्यांचे पाय जमीनीवर राहिले. 

गोरगरीब, वंचित, कष्टकरी समाजाची उन्नती हेच त्यांचे लक्ष्य असे. भरपूर दौलत कमावली पण या दौलतीचा हिश्‍यात लोकांनाही सहभागी केले. अशीही अजरामर जोडी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र, काळूबाळू हे नाव आजही घेतले जाते. तमाशा कलावंताना त्यांचे कदापी विस्मरण होणार नाही. पण, आपल्या राज्यकर्त्यांनाही ते वेळप्रसंगी आठवतात. हे काळूबाळूंच्या तमाशाचे यश म्हणावे लागेल. हल्ली राजकारणाचाच तमाशा झाला आहे. त्यामुळे आपल्या राज्यकर्त्यांना तमाशा नाही आठवणार तर काय होणार हो ! 

महाष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने सुरू आहे हे कळत नाही. शिवसेना भाजपवर तुटून पडते आहे. तर शिवसेनेवर मध्येच राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार हल्ले चढविण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जे काही सुरू आहे. ते पाहून खरंच मनोरंजन सुरू आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळेच की काय अजित पवारांना तमाशा आठवला. राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार कधी कोसळते यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मंडळी देव पाण्यात बुडवून बसली आहेत. मात्र सरकारवर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे विशेषत: राष्ट्रवादी अधिकच आक्रमक झाली. दुसऱ्याच्या काठीने साप मारला जावा असे राष्ट्रवादीला वाटते. पण, तिकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातात काठी घेण्याऐवजी पुंगी घेतली. ते सापाला काही मारायला तयार नाहीत. त्यांना आपल्या तालावर सरकारला नाचावायचे आहे. त्यांना कितीही उचकाविण्याचा प्रयत्न केला तरी ते उचकत नाहीत. पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देतात पण, पाठिंबा काढत नाही. मध्येच फटकारतात तर लगेच कुरवाळतात. 

सत्तेतून बाहेर पडलो तर काय परिणाम होतील याची जाणीव त्यांना असावी. ते हुशार आहेत. सरकारमध्ये राहूनच ते ही लोकांचे मनोरंजन करीत आहेत. हे असेच आरोप करीत कसे तरी आणखी दीड वर्षे ढकलत नेतील. शिवसेना एकाच वेळी दोन भूमिका पार पाडत आहे. एक सत्ताधाऱ्याची आणि दुसरी विरोधाचीही. राष्ट्रवादी किंवा अजित पवार आता शिवसेनेवर टीकास्त्र सोडत आहेत. कारण शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल या प्रतीक्षेत असलेल्या दोन्ही कॉंग्रेसचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेला लक्ष्य करणे साहजिक आहे. 

शिवसेनेचेचे अधिक नुकसान 
आज शिवसेना भाजप सरकारच्या प्रत्येक मुद्यावर ज्या पद्धतीने स्टॅंड घेत आहे तो लोकांच्या पचनी पडताना दिसत नाही. आज एक तर उद्या दुसरेच. कशाचा पायपोस कशालाच नाही. एखाद्या मुद्यावर शिवसेना ठाम आहे असे चित्र गेल्या काही दिवसात पाहावयास मिळाले नाही. सरकारमध्ये बसायचे आणि बाहेर सरकारलाच विरोध करायचा हे ही लोकांना आवडेनासे झाले. राणाभिमदेवी थाटात रोज गर्जना करायच्या आणि मुख्यमंत्र्यांनी गोंजारले की गप्प बसायचे. हे दररोजच चालले आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत तर शिवसेनेने कितीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते मिळत नाही असे दिसून येत आहे. समृद्धीबाबतही तेच होताना दिसत आहे. सगळे श्रेय मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पडत आहे. हे शिवसेनेच्या लक्षातच येत नाही. भाजप शिवसेनेला अजिबात महत्त्व देत नाही. त्याच्या इशाऱ्याकडे तर दुर्लक्ष. एकीकडे भाजप गप्प तर दुसरीकडे राष्ट्रवादी शिवसेनेला दररोज पंच देत आहे. त्यामुळे भाजपची नव्हे तर शिवसेनेचीच अधिक अडचण होताना दिसत आहे. 

काळूबाळूंनी जी वगनाट्ये गाजली त्यापैकी "शेराला भेटला सव्वाशेर' हे एक. राजकारणातील शिवसेनेसारख्या शेराला राष्ट्रवादी सव्वाशेर म्हणून भेटली आहे. कॉंग्रेसविषयी तर काही बोलायलाच नको. ती फुटीच्या विळख्यात सापडली आहे. राजकारण म्हणजे तमाशाचा फडच बनला आहे. लोकांचे मनोरंजन सुरू आहे. जनतेच्या प्रश्‍नावर शिवसेनेसह विरोधकांनी ज्या ताकदीने सरकारवर तुटून पडायला पाहिजे होते. तसे चित्र मात्र दिसत नाही. असे म्हणावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com