नौटंकी निरूपम यांच्या  हाती लवकर नारळ द्या ! 

 नौटंकी निरूपम यांच्या  हाती लवकर नारळ द्या ! 

सेक्‍यूलेरिझम हा कॉंग्रेसचा जो पाया आहे. हा पायाच उखडून टाकण्याचे काम कॉंग्रेसचे संजय निरूपम करीत आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. भगवे कपडे घातलेले साधू महंत पक्षात आले म्हणजे लोकांना पक्षाविषयी आत्मियता वाटेल असे जर त्यांच्या डोक्‍यात असेल तर हा मुर्खपणा आहे. कॉंग्रेसचा जो दीडशे वर्षाचा इतिहास आहे. ज्या पायावर कॉंग्रेसची इमारत उभी आह.े तिला तडा पाडण्याचे काम मात्र निरूपम यांच्यासारखे उद्योगी माणंस करीत आहेत असे म्हणावे लागेल.

जी कॉंग्रेस दिवसेंदिवस अडचणीचा सामना करीत आहे. तिला आणखी अडचणीत आणण्याचे काम संजय निरूपम यांच्यासारखे महाभाग करीत आहेत. दुर्दैवाने या पक्षालाही असेच नौटंकी करणारे नेते लाभले आहेत. असे म्हणावे लागेल. निरूपम यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाही. समज देत नाहीत. असले लाड दुसऱ्या कुठल्याही पक्षाने खपवून घेतले नसते. ज्या पक्षात हे महाशय जातील त्या पक्षाचे कदापि भले होणार नाही हे आपल्या आचारविचाराने ते दाखवून देतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. 

खरे तर निरूपम मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष नसते तर त्यांच्या नौटंकीची कोणी दखलही घेतली नसती. पण, ते एका मोठ्या पक्षाचे नेते आणि माजी खासदार आहेत. त्यामुळे ते जे काही बोलतात आणि निर्णय घेतात त्याची दखल घेणे भाग आहे. पक्षाच्या मुखपत्रातच सोनिया गांधींविषयी त्यांनी जे काही प्रसिद्ध केले होते. त्यावेळी तर पक्षाची काय शोभा राहिली होती हे नव्याने सांगण्याची गरज नाही. उरीतील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ""पीओके''त दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर या महाशयांनी केंद्राने पुरावे द्यावेत. ही कारवाईच बनावट आहे असे म्हटले होते. अशी वादग्रस्त विधाने करण्यात निरूपम हे पटाईत आहेत. 

ज्या कॉंग्रेसचा मोदी लाटेत पालापाचोळा झाला. त्या कॉंग्रेसला आणखी अडचणीत आणण्याचे काम त्यांनी पुन्हा केले आहे. कोणत्याही कॉंग्रेस नेत्याला रूचणार आणि पचणार नाही असाच निर्णय त्यांनी घेऊन टाकला. मुंबई कॉंग्रेसने संत-महंताचा कक्ष सुरू करून टाकला. हा कक्ष सुरू करण्यापूर्वी त्यांनी कोणाचा सल्ला घेतला हे ही अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी तर या प्रकरणी कानावर हात ठेवले आहेत. राज्यातील कोणताही नेता काहीच कसा बोलत नाही. प्रदेशाध्यक्षांचे हातावर घडी तोंडावर बोट आहे. खरेतर असा कक्ष सुरू करण्याची गरज काय होती ? किती सांधू महंत कॉंग्रेसला संजीवनी मिळवून देऊ शकतात. हे सांधूमहंत चमत्कार घडवू शकतात का ? कॉंग्रेसचा पायाच मुळी धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्‍यूलर आहे. पक्ष हे तत्व घेऊन दीडशे वर्षे चालला. ज्या तत्वावर कॉंग्रेसचा चिरेबंदी वाडा उभा आहे. त्याला तडे पाडण्याचेच नव्हे तर पायाच उखडून टाकण्याचा प्रयत्न मुंबईत एक नेता करतो आहे याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी खरेतर घ्यायला हवी. कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी तर वारंवार सांगतात, की कॉंग्रेस दलित, मुस्लिमांसह सर्वानाच बरोबर घेऊन चालेल. पक्षाला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. पण; सेक्‍यूलर या विचारधारेशी कदापी फारकत घेणार नाही. मात्र निरूपम यांच्या सारख्या नेत्याच्या लक्षात हे का येत नाही. कॉंग्रेसची जी व्होट बॅंक होती ती कॉंग्रेसपासून का दूर गेली. याचा विचार या पक्षाचे नेते करीत नाही. वर्षानुवर्षे दलित, मुस्लिम, ओबीसी, ख्रिश्‍चनांसह अठरापगड जातींचे पाठबळ कॉंग्रेसला होते. त्यामुळे जर निरूपम यांनी सर्व जातीधर्माच्या संतमहंतांचा कक्ष उभारला असता तर समजण्यासारखे होते. केवळ हिंदूंचा कक्ष स्थापन करून पक्ष काहीही साध्य करू शकत नाही. 

आज गोरक्षकांनी देशभर जो काही धुमाकुळ घातला आहे. स्वयंघोषीत गोरक्षक तालिबानीसारखे लोकांना ठार मारत आहेत. ठराविक समाजाला लक्ष्य केले जात आहे. अशा गंभीर घटनांविषयी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही चिंता व्यक्त केली आहे. देशात असहिष्णू वातारवरण असताना कॉंग्रेसमध्ये अशा सांधूसंत महंताची खरंच गरज होती का ? कॉंग्रेसने सांधूसंत पक्षात घेतल्यास पक्षाला पूर्व वैभव प्राप्त होणार आहे का ? समाजात साधूसंताची आणि बाबा बुवांची काही कमी नाही. ज्या संतानी आपल्या आचारविचाराने आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या विचाराचे अनुकरण केल्यास कॉंग्रेस नेत्यांची प्रतिमा आणखी उजाळून निघेल. केवळ पक्षातच सांधूमहंताचा कक्ष कशासाठी हवा. या पक्षातील नेते भ्रष्टाचारापासून दूर गेले. गोरगरीबांना न्याय दिलात. सामान्यांचा विश्वास निर्माण केलात. तरच लोक तुमच्या बरोबरच येतील. 

लोक काही इतके मुर्ख नाहीत की तुमच्या कुठल्या तरी फडतूस कक्षाने प्रभावित होतील. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यांच्या लढ्यात सर्व धर्माना बरोबर घेतले. पहाटे उठून तेही भजन करीत. "रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम' हे भजन ते म्हणत. गांधीचीनीही प्रार्थनेला महत्त्व दिले. पण त्यांचा हेतू शुद्ध होता. त्यांचे एकच लक्ष्य होते ते म्हणजे स्वातंत्र्य. नाहीतर तुमच्या सारखे आधुनिक कॉंग्रेसचे नेते करता आहेत नौटंकी. या नौटंकीला कोणीही भुलणार नाही आणि फसणार नाही हे निरूपम यांनी लक्षात घ्यायला हवे. एकीकडे धर्माच्या नावावर धिंगाणा घातला जात आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. त्यामुळे कॉंग्रेसपुढे तर मोठे आव्हान आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष ज्या तत्वावर उभा राहिला त्या तत्वालाच हतरताळ फासला जात असेल तर कॉंग्रेस नेतृत्वाने संजय निरूपम यांच्या हाती होता होईल तितक्‍या लवकर नारळ देण्याची गरज आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com