नरेंद्र मोदींना पर्याय कोण हेही सांगा ! 

नरेंद्र मोदींना पर्याय कोण हेही सांगा ! 

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष राम जरी आला तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अशक्‍य असल्याचे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे म्हणणे आहे. पण, मोदींना पर्याय कोण ? हे ते सांगत नाहीत. मोदींना सत्तेवरून खाली खेचू शकेल आणि तशी धमक असलेला नेता आजतरी भारतीय राजकारणात दिसत नाही. हे कटूसत्य त्यांच्या विरोधकांनी मान्य करायला हवे.

कुमार केतकर हे ज्येष्ठ आणि व्यासंगी पत्रकार आहेत. त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरापासून गावखेड्यापर्यतच्या घडामोडीवर लक्ष असते. त्यामुळे ते जे काही भाष्य करतात त्यावर लोक विश्वास ठेवतात. त्यांच्याविषयी आदरही व्यक्त करतात. महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्तासारख्या आघाडी दैनिकाचे संपादकपदही त्यांनी भूषविले आहे. राजकारणावर त्यांनी केलेल्या लिखानाचीही दखल नेहमीच घेतली गेली. अभ्यासपूर्ण हल्ले चढवायचे कसे याचा वस्तुपाठ त्यांच्या लेखनात आणि भाषणात आहे. व्यासंगी पत्रकार कुमार केतकर मुळचे कम्युनिस्ट विचारसरणीचे. पण, पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या आणि प्रामुख्याने श्रीमती सोनिया गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. पहाता पहाता ते कट्टर सोनिया निष्ठ झाले. सोनिया गांधी यांना जे विरोध करतील त्यांना कुमार केतकर यांनी टीकेचे लक्ष्य केले. मग ते भाजपचे नेते असो की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार असोत. 

केतकरांनी त्यांच्यावर प्रखर प्रहार केले. नरेंद्र मोदींची लाट 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जाणवत असतानाही कॉंग्रेसच पुन्हा सत्तेवर येणार असे केतकर छातीठोकपणे सांगत होते. जे अशक्‍य दिसते तेही शक्‍य आहे. हे सांगावे तर केतकरांनीच. नांदेड येथे नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांनी जे भाष्य केले आहे. त्याची दखल घेणे आवश्‍यक वाटते. 

केतकरांचा मोदीवरील राग समजण्यासारखा आहे. आगामी 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष राम जरी आला तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अशक्‍य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते का येवू शकत नाहीत याची त्यांनी काही कारणे दिली आहेत. ठिक आहे. मोदी येणार नाहीत मग येणार कोण आहेत हे ही ते सांगत नाहीत. पुढील निवडणूक कॉंग्रेससह कोणता विरोधी पक्ष स्वबळावर किंवा आघाडी करून निवडून येऊ शकतो. याचे आजही नाव घेता येत नाही. ते केतकरांनीही घेतलेले नाही. आज कोणी काहीही म्हटले तरी देशात मोदींना पर्याय उभा राहिला असे एकही नाव घेता येत नाही. ज्या राहुल गांधींचे नाव घेतले जाते. त्यांचा मोदींसमोर टिकाव लागू शकत नाही. हे जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच बोलून दाखविले आहे. 

कॉंग्रेसमधील दिग्गजांनाही याची कल्पना आहे. पण, बोलणार कोण हा ही प्रश्‍न उरतोच. राहुल यांना थोडे बाजूला ठेवले तरी देश ढवळून काढू शकतो असे एकही नेतृत्व आजतरी दिसत नाही. ज्या नीतिशकुमारांकडे पाहिले जात होते तेच आता "एनडीए'ला पाठिंबा देऊन मोकळे झाले. त्यांना बिहारमध्ये लालू प्रसादांचा उपद्रव नको आहे. 2019च्या निवडणुकीत ते "एनडीए'बरोबर जातील अशी आताच चर्चा होऊ लागली आहे. ज्या दिवशी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्याचदिवशी नीतिशकुमार हे फार काळ लालूंबरोबर राहाणार नाहीत असे राजकीय तज्ज्ञांचे मत होते. ते चित्र आता दिसत आहे. 

दुसरा जादूगार कोण? 
पंतप्रधान होणार नाहीत. ते कसे होणार नाहीत याचा अंदाज वर्तविण्यापेक्षा ठोस कारण सांगितले तर बरें झाले असते. नोटाबंदी, "जीएसटी'बाबत जी उदाहरणे ते देत आहेत. त्यामुळे लोक नाराज आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे. पण, या महत्त्वाच्या निर्णयानंतरही लोक मोदींच्या मागे उभे राहिले आहेत. लोकांनी त्रास सहन करूनही त्यांनाच पसंती दिली. कॉंग्रेस नको हीच भावना आजही लोकांमध्ये आहे. कॉंग्रेसने लोकांमधील विश्वास गमावला आहे आणि हा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. राहुल प्रयत्न करीत आहेत पण, लोकांच्या पंसतीला ते अजूनही उतरत नाही. देशभरातील लोकांच्या ह्दयावर राज्य करणारा नेता म्हणूनच नरेंद्र मोदींचेच नाव आहे. तसे दुसरे नाव सध्या तरी दिसत नाही. 

लोकांवर संमोहन करण्यात आले असले तरी जास्त काळ संमोहन टिकत नाही. काही संमोहनात असलेले लोक महागाईचे चटके व नोटांबदीचा फटका बसला तरीही "मोदी अच्छा कर रहे है' असे म्हणत आहेत. संमोहित अवस्थेतून बाहेर आल्यानंतर दुखायला लागते. नव मध्यम वर्गाला आता त्याची जाणीव होईल. 2019 मध्ये भाजपचा पराभव होईल. पण त्यांचा पराभव कॉंग्रेसमुळे होणार नाही असेही केतकर यांचे म्हणणे आहे. जर कॉंग्रेस मोदींचा पराभव करू शकत नसेल तर देशात आजतरी एकही असा पक्ष नाही तो मोदींचा पराजय करू शकेल. त्यामुळे पुढची दहा पंधरा वर्षे भाजपला चिंता करण्याचे कारणही नाही. मोदींना आव्हान देणारा खुद्द भाजपमध्ये आणि विरोधी पक्षातही नेता नाही. हे कटूसत्य आहे. ते मान्य करावे लागेल. 

सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग, लालू प्रसाद, मायावती, मुलायमसिंग, करूनानिधी आदी म्हणून ते काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा करिश्‍मा चालत नाही. आता या नेत्यांमध्ये देश पिंजून काढण्याची धमकही राहिलेली नाही. सोनिया गांधी सोडल्या तर उर्वरित सर्व नेते आपल्या राज्यापुरते मर्यादीत आहेत. त्यामुळे त्यांची तुलनाही मोदींबरोबर करता येणार नाही. हे वास्तव आहे. केतकर यांच्या मनात जे आहे ते देशातील असंख्य लोकांनाही वाटते. मोदी विरोधकही आहेत. पण, आपल्याला वाटते म्हणून अशक्‍याचे शक्‍य होईल कसे. 

केतकर हे तर राजकीय भाष्य करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांचा आदर राखून असे म्हणावेसे वाटते त्यांनी भाकित करू नये तर दोन ठोस गोष्टी सांगितल्या तर पटेल. त्यांचा मोदी विरोध समजण्यासारखा आहे. मोदींना विरोध झालाच पाहिजे त्याबाबत दुमत असण्याचे कारणही नाही. मात्र मोदींना होणार विरोध लोकांना पटवून देता आला पाहिजे. फक्त विरोधाला विरोध करून चालणार नाही. कणा नसलेले समाजवादी आणि पोथीनिस्ट कम्युनिस्टांच्या भावना समजण्यासारख्या आहेत. जगभर उजव्या विचारसरणींचे वारे वाहत आहे. त्याला भारतही अपवाद नाही. मोदींना लोकांनीच निवडून दिले आहे. त्यामुळे लोकांच्या मताचा आदरही केतकर यांच्यासह मोदींच्या टीकाकारांनी करायला हवा असे वाटते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com