bliog on ganesh festival | Sarkarnama

 गणेशोत्सव दणक्‍यात करा, पण सामाजिक भान ठेवून 

उत्तम कुटे
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018


गणेशोत्सवाबाबत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले विधानही आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. सार्वजनिक मंडळांकडून जबरदस्तीने घेण्यात येणाऱ्या वर्गणीतून खंडणीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार या उत्सवाला मिळालेल्या वेगळ्या व अनिष्ट वळणाला दुजोरा देते आहे. त्यामुळे पुन्हा हा सण इष्ट वळणावर आणणे आता गरजेचे झाले आहे. त्याला काही मंडळांनी थोडीशी सुरवात केली आहे. मात्र, ती पुरेशी नाही. 

राज्य मंत्रिमंडळातील दोन नंबरचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतेच सातारा येथे एक विधान केले. ते विचार करण्याजोगे आहे. एवढेच नाही, तर त्यावर मंथनही होणे आवश्‍यक वाटते. गणेशोत्सव पुन्हा घरात नेण्याची वेळ आलीय असे सार्वजनिक बांधकाममंत्री असलेले चंद्रकांतदादांचे हे वक्तव्य आहे.

सर्वसामान्यांना अशा उत्सवाचा त्रास कशाला अशी विचारणाही त्यांनी केली आहे. सध्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर त्यांनी त्यातून त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध अशी ही टिपण्णी केली आहे. ती बहुतांश खरी वाटते. ती लागू पडणाऱ्या मंडळांनी त्याचा विचार केला पाहिजे. 

मतांचा विचार न करता एखाद्या राजकीय नेत्याने प्रथमच असे धाडसी विधान केले आहे. त्यातही भाजपसारख्या पक्षाच्या मंत्र्यांने करणे म्हणजे, जरा अतीच झाले.त्यांच्यअगोदर पर्यावरणप्रेमी व न्यायालयाकडून उत्सवाची जागा इव्हेंटने घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवावर विविध आक्षेप घेण्यात आलेले आहेत. जल,वायू आणि ध्वनी अशा तिन्ही प्रकारचे प्रदूषण होत असल्याचा ठपका या उत्सवातून ठेवण्यात आलेला आहे.

त्यात सध्या काहीअंशी जागृतीमुळे बदल होत आहे. पंरतू, तो वैयक्तिक पातळीवर आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल दिसून येत नाही. त्यामुळेच चंद्रकांतदादांना वरील विधान करावे लागले आहे. 

राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यांना असे विधान करायला का लागले त्याचा अभ्यास हा उत्सव दुसऱ्यांना त्रास होईल, अशा पद्धतीने साजरा करणाऱ्यांनी करण्याची वेळ आली आहे.रात्रभर लावण्यात येणाऱ्या व प्रचंड मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण करून ज्येष्ठांना त्रासदायक ठरत असल्यामुळेच न्यायालयाला लाऊडस्पीकरला रात्री दहा वाजेपर्यंतचे बंधन घालण्याची पाळी आली. सध्या डीजेचा विषयही न्यायालयात आहे. गणेशाच्या आगमन व विसर्जनप्रसंगीच नव्हे,तर लग्नातही डीजेचा दणदणाट सुरू असतो. 

कानठळ्या बसविणाऱ्या या डीजेवर त्यातूनच पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, ती सर्रास धुडकावली जात आहे. पीओपीच्या गणेश मुर्त्यांमुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. त्यावर आता शाडूच्या मुर्त्या आणि हौदात विसर्जन करण्याकडे कल वाढू लागला आहे, हे चांगले लक्षण आहे.

तसेच मुर्तीदानही होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हा सर्व हितकारी बदल घरगुती गणपतीच्या बाबतीतच अधिक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्याचे अनुकरण करण्याची खरी गरज आहे. मंडळांत उत्सव काळात भजन, कीर्तन याऐवजी सिनेमाची गाणी वाजतात. इतर मोठ्या आवाजातील कार्यक्रम होतात, याला मंत्रिमहोदयांचाच नाही,तर इतर सजग नागरिकांचाही आक्षेप आहे. 

घरातील गणपती चौकात आणण्यामागील सार्वजनिक गणेशोत्सवात राहिला नसल्याचे मंत्र्यांचे विधानही आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. मंडळांकडून जबरदस्तीने घेण्यात येणाऱ्या वर्गणीतून खंडणीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार या उत्सवाला मिळालेल्या वेगळ्या व अनिष्ट वळणाला दुजोरा देते आहे. त्यामुळे पुन्हा हा सण इष्ट वळणावर आणणे आता गरजेचे झाले आहे. त्याला काही मंडळांनी थोडीशी सुरवात केली आहे. मात्र, ती पुरेशी नाही. 

उत्सव साजरा करण्यास कुणाचा आक्षेप नाही. मात्र, फक्त तो करताना भान राखणेही गरजेचे आहे. फक्त हिंदू सणाच्या बाबतीतच हे आक्षेप घेतले जातात. पर्यावरणप्रेमी जागृत होतात, हा आक्षेपही तर्कसंगत नाही. दिवाळीत फटाक्‍यांमुळे मोठे ध्वनी व हवाप्रदूषण होते. त्यामुळेच न्यायालयाला सव्वाशे डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके निर्मितीवरच बंधन घालावे लागले आहे.

जसा साधेपणाच्या गणेशोत्सवाने कुणाला त्रास होणार नाही, तसा हा उत्सव साजरा करण्याला कुणाचा आक्षेप नाही. तसाच तो दिव्यांचा सण असलेला दिवाळीही साजरा करण्यास नाही. फक्त त्यावेळीही मोठ्ठा आवाज करणारे फटाके न फोडता रोषणाईचे फोडण्याची आवश्‍यकता आहे. 

एकूणच सर्वच सणांना अनिष्ट पायंडा पडल्याने मनुष्यजातीला नव्हे,तर प्राणी व पक्षांनाही त्याची झळ बसते आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. पक्षी शहरातून गायब झाले आहेत. ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढला आहे.  परिणामी दुष्काळ व पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. हा जागतिक तापमानवाढीचा धोका वेळीच रोखण्याची गरच आहे. अन्यथा निसर्ग या चुकीला माफी देणार नाही.

तो माफी देतही नाही. त्याला दुजोरा देणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे निसर्गाचा कोप टाळण्यासाठी मानवाने आपल्या चुका सुधारणे गरजेचे बनले आहे.त्याची सुरवात इको फ्रेंडली सार्वजनिक गणेशोत्सवातून झाली,तर विघ्नहर्त्या गणेशाला ग्लोबल वार्मिगमुळे येणारी संकटे व इतर विघ्ने दूर करण्याचे साकडे घालावे लागणार नाही. 

संबंधित लेख