"लडेंगे भी और जीतेंगे भी'' अर्थात  भाजपचा शिवसेनेवर दबावाचा डाव 

"लडेंगे भी और जीतेंगे भी'' अर्थात  भाजपचा शिवसेनेवर दबावाचा डाव 

पुणे ः खरे तर महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाच्या आमदाराला मध्यावधी निवडणुका नको आहेत. शेतकरी कर्जमाफी निकषावर होत असतानाही भाजपच्या आमदारांना मध्यावधी वगैरे निवडणुका नको आहेत. शिवसेनेच्या आमदारांना तर या निवडणुका अगदी नको म्हणजे नकोच आहेत. भाजपचा विजयाचा अश्‍व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे गड सर करीत सुसाट सुटलेला असताना "मध्यावधी' या शब्दाचा शिवसेना आमदारांनी धसकाच घेतला आहे. मग अचानक हे मध्यावधीचे पुराण कसे सुरू झाले ? 

या पुराणामागे राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने परस्परांवर दबाव टाकण्याचे आणि परस्परांना वाकविण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. त्यामुळे सगळा देश भारत-पाकिस्तान सामन्याकडे लक्ष लावून बसलेला असेल, तेंव्हा राजकीय निरीक्षकांचे लक्ष मात्र अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सामन्यावर लागलेले असेल. या बैठकीत (रविवार) दोन्ही बाजूनी तडजोड होऊन निकाल लागतो काय याकडे सर्व नजरा लागलेल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या बदल्यात शिवसेनेला काय मिळणार याविषयी देखील चर्चा आहे. 

उद्धव ठाकरे परदेश वारीवर असताना शिवसेनेतर्फे राज्यात खिंड लढवीत असलेल्या संजय राऊत यांनी जोपर्यंत उद्धवजी परतल्याच्या तोफा वाजत नाहीत तोपर्यंत भाजपवर आक्रमक हल्ला चढविलेला होता. जळगाव येथे "नाथाभाऊं'च्या कर्मभूमीत तर जुलैत राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत करून खळबळ उडवून दिली. संजय राऊत तोफा डागत असताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकरी कर्जमुक्तीवर सशर्त आणि काही अटींवर अधीन राहून फक्त भाजपचीच मोहोर उमटेल याची पुरेपूर खात्री करून घेतली. कर्जमाफीचे बहुतांशी विषय मार्गाला लागल्यानंतर उद्धव ठाकरे परदेशाहून परतले आणि त्यांनी कर्जमाफीवरून सरकारला जाहीर इशारेही देण्यास सुरवात केली. पण, तोपर्यंत उशीर झालेला होता. उद्धव ठाकरेंची अवस्था "वरातीमागून घोडे' या म्हणीनुसार झालेली. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी फक्त दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी भाजप मध्यावधी निवडणुकीस तयार आहे अशी घोषणा केली. चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांचे नाव न घेता "तुमची इच्छा असेल तर आमचीही तयारी आहे' या शब्दात पुन्हा मध्यावधीचा राग आळवला. अमित शहा मुंबईत आल्यावर सामोपचाराची भूमिका घेतील असे राजकीय निरीक्षकांना वाटत होते. अमित शहा यांनी आधीच्या नेत्यांच्या वक्तव्यावर वरताण करणारे विधान केले. मध्यावधी निवडणुकींचा प्रसंग आलाच तर "आम्ही लढूही आणि जिंकूही', अशी आक्रमक भाषा अमित शहा यांनी केली. 

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भाषा पाहिली तर शिवसेनेने टाकलेला दबाव परतवून लावीत शिवसेनेवरच उलटा दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार सतत अस्थिर ठेवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांवर भाजपने टाकलेला मध्यावधीचा रिव्हर्स स्विंग खेळण्याच्या मनस्थितीत नसलेल्या उद्धव ठाकरेंनी या पूर्वीच भाजपने निवडणुकांवर खर्च होणार पैसा शेतकऱ्यांना द्या असे म्हणत चेंडू सोडून दिलेला आहे. शिवसेना आणि भाजप हे दोघेही सत्तेत सहभागी आहेत. असे असताना परस्परांच्या विरोधात आक्रमक पवित्रा जाहीरपणे घ्यायचा आणि शेवटी चर्चेला बसून आपल्याला हवे असलेले पदरात पाडून घ्यायचे असे डावपेच दोन्ही बाजूंनी लढविले जात आहेत. 

भाजपला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची आवश्‍यकता आहे. उद्धव ठाकरे यांनाही अमित शहा यांचा दौरा कशासाठी आहे. याची पूर्ण कल्पना आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते. आताही त्यांनी कृषी अर्थतज्ज्ञ स्वामीनाथन्‌ यांचे नाव पुढे केले आहे. अमित शहा यांनी सर्वांनाच राष्ट्रपतीपदासाठी नाव सुचविण्याचा अधिकार आहे, असे म्हणत शिवसेनेची गणना सर्वांमध्ये करून टाकली. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरेंची भेट छत्तीस तासांवर आलेली असताना शिवसेना मंत्रीमंडळात सहभागी आहे किंवा नाही याची माहिती दररोज घेतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीपूर्वी परस्परांवर दबाव टाकण्याचा आणि परस्परांच्या मनोबलाचा अंदाज घेण्याचा हा प्रकार आहे. मात्र प्रत्यक्ष भेटीत भूकंप होणार नाही तर मधला मार्ग निघेल असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com