bjp's winning equation viral | Sarkarnama

सासरे + जावई = भाजपचा महापौर

  मुरलीधर कराळे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

महापौर निवडणुकीत काँग्रेसचे पाचही नगरसेवक तटस्थ राहिले.

नगर : 'सासरे + जावई = भाजपचा महापौर' हा मेसेज आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महापालिकेत केवळ १४ नगरसेवक मिळवूनही महापौर व उपमहापौर भाजपचाच झाला, ही किमया कोणी केली? याचा किंगमेकर कोण? याचे उत्तर नेटिझन्सने वरीलप्रमाणे दिले आहे. 

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे जावई आहेत. या दोघांनी किमया करून भाजपला महापौररपद मिळवून दिले, असे संकेत त्यातून दिले जात आहेत.

भाजपचा महापौर होण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या. आमदार कर्डिले यांनी यापूर्वी केडगावमधील काँग्रेसचे सर्वच उमेदवार पळवून भाजपमध्ये नेले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या रात्रीत ही किमया केली. महापौरपदाच्या निवडीतही तोच फंडा वापरला गेला. शेवटच्या दिवशी म्हणजे काल याबाबत वेगवान हालचाली झाल्याचे सांगितले जाते. 

मुख्यमंत्र्यांनीही या विषयी लक्ष देवून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा महापौर झाला पाहिजे, असे आदेशच दिल्याचे समजते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महापौर भाजपचाच करण्यासाठी नेत्यांनी जिवाचे रान केले. त्यात आमदार कर्डिले यांनी केलेली कामगिरी पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. त्यामुळे कर्डिले यांचे वजन मुख्यमंत्री दरबारी अधिक वाढले, असे मानले जाते. 
 
महापौर निवडणुकीत काँग्रेसचे पाचही नगरसेवक तटस्थ राहिले. याचाच अर्थ सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच साथ दिल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीला आमदार जगताप व आमदार कर्डिले यांनी विखे यांना मदत करायची, अशी पडद्यामागे खेळी झाल्याचे सांगितले जाते. 

संबंधित लेख