BJP`s six months in PMC | Sarkarnama

विरोधक म्हणतात पुण्यात भाजपचा पेपर कोरा! तर भाजपचा `फर्स्ट क्लास' तयारीचा दावा! 

उमेश घोंगडे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता येऊन सहा महिने पूर्ण झाले. यानिमित्त सरकारनामाने सत्ताधारी आणि विरोधक यांची मते जाणून घेतली. सरकारनामाच्या फेसबुक लाइव्ह चर्चेच स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि विरोधी नेते चेतन तुपे सहभागी झाले. दोघांनी आपली मते यात आक्रमकपणे मांडली.

पुणे : भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत सत्तेवर येऊन 15 सप्टेंबरला सहा महिने पूर्ण होत आहेत. भाजपने या सहा महिन्यांत केलेल्या कारभाराला काय मार्क द्याल, असा प्रश्‍न पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना विचारला असता त्यांनी भाजपने पेपर कोरा सोडविलेला आहे. या कोऱ्या पेपराला शून्यच मार्क द्यावे लागतील, अशी टीका केली. 

दुसरीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अजून परीक्षा सुरूही झालेली नाही. मात्र आमची फर्स्ट क्‍लास तयारी झालेली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या परीक्षेत आम्ही यशस्वी होऊ, असा दावा त्यांनी केला. 

"सरकारनामा'च्या "फेसबुक लाइव्ह'वर या दोघांची जुगलबंदी गुरूवारी चांगलीच रंगली. या लाइव्ह चर्चेच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही चर्चा फेसबुकवर जोरात सुरू होती. 

पुण्याची सार्वजनिक वाहतूक, कचऱ्याचे नियोजन, चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील कामाची रद्द करण्यात आलेली निविदा प्रकिया आणि मेट्रासह इतर विकास कामांबाबत यावेळी चर्चा झाली. दोघांनीही आपले मुद्दे ठामपणे मांडले. 

""भाजपला सत्तेत येऊन सहा महिने झाले. पाच वर्षातील 10 टक्‍के कार्यकाल संपला. मात्र यांच्या कामाची चुणूक काही दिसली नाही. साऱ्याच योजना कागदावर चांगल्या दिसत आहेत. मात्र कारभार अत्यंत उदासीन आहे. या सहा महिन्यांच्या काळात शहराचा विकास भरकटल्याची पुणेकरांची भावना झाली असून भाजपचे सत्ता केंद्र महापालिकेबाहेर आहे. महापालिकेतील पदाधिकारी सत्ता राबविण्यात अक्षम असल्याने अनेक निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागते, अशी टीका तुपे यांनी केली. 

राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुर्ननिर्माण योजनेतून (जेएनएनयुआरएम) एक हजार सातशे कोटी रूपये मिळाले. यांच्या स्मार्ट सिटी योजनेतून केवळ 500 कोटी रूपये पाच वर्षात मिळणार आहेत. मात्र स्मार्ट सिटीचा कारभारातही गोंधळच आहे. 52 योजना जाहीर केल्या. मात्र त्यातील पाच योजनाही धडपणे सुरू नाहीत. साऱ्याच आघाड्यावर यांना अपयश येत असल्याचे तुपे यांनी यावेळी सांगितले.

शिस्तबद्ध म्हणवल्या जाणाऱ्या भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढली आहे. त्यातून शहराचे नुकसान होत आहे. गेल्या सहा महिन्यातील यांची कामगिरी पाहता पुणेकरांनी दाखवलेला विश्‍वास भाजपने गमावल्याचा आरोप त्यांनी केला. 

तुपे यांच्या टीकेला मोहोळ यांनी तितक्‍याच तडफेने उत्तरे दिली. अर्थसंकल्प तयार होऊन चार महिने देखील झालेले नाहीत. त्यात जीएसटीमुळे निविदा रखडल्या आहेत. या अडचणी दूर झाल्याकी सर्व कामे सुरू होतील. पुणे शहराच्या भविष्यासाठी असणारे योग्य नियोजन या सहा महिन्यांत केल्याचा दावा त्यांनी केला. 

मोहोळ म्हणाले, "आठशे नव्या बस खरेदीचा निर्णय आम्ही तातडीने मार्गी लावला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 200 बस लवकरच रस्त्यावर दिसतील. नव्या बस घेण्याबरोबराच मेट्रोच्या कामालादेखील येत्या काही दिवसात वेगाने सुरवात होईल. वाहतूक व कचरा या दोन मोठ्या समस्या सोडविण्यात आधीचे सत्ताधारी अपयशी ठरले. मात्र आम्ही यातून नक्की मार्ग काढू.`` 

कचऱ्याचा प्रश्‍न तितकाच गंभीर असून त्याच्या सोडवणुकीसाठी नवे प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न अंतीम टप्प्यात आहेत. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या करातून आलेला पैसा वाचविण्याचा प्रयत्न आहे. कमी खर्चात ही योजना आम्ही निश्‍चितपणे मार्गी लावू, असा विश्‍वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

विरोधकांना जनतेने नाकारले आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे चांगल्या कामात अडथळा आणण्याचा उद्योग विरोधकांनी सोडावा, असा सल्ला मोहोळ यांनी दिला. 

संबंधित लेख