bjp`s show of strength in pune for PM`s tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त भाजपचे शक्तिप्रदर्शन!

अमोल कविटकर
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या चौथ्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीतील दारुण झालेल्या पराभवानंतर बॅकफुटला गेलेल्या भाजपने पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी कंबर कसली असून तीस हजार नागरिकांना कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याचे 'लक्ष्य' पदाधिकऱ्यांना देण्यात आले आहे.

पुणे : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या चौथ्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीतील दारुण झालेल्या पराभवानंतर बॅकफुटला गेलेल्या भाजपने पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी कंबर कसली असून तीस हजार नागरिकांना कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याचे 'लक्ष्य' पदाधिकऱ्यांना देण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या देशातील कामाचा आरंभ श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात मोदींच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे मेट्रोचे भूमिपूजन कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींच्याच हस्ते करण्यात आले होते. त्याचा मोठा फायदा पक्षाला महापालिका निवडणुकीत झाला होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमालाही ते आले होते. याच कार्यक्रमात त्यांनी शरद पवार यांचे बोट धऱून राजकारणार आल्याचे सांगत गौप्यस्फोट केला होता.

आता पीएमआरडीएच्या माध्यमातून साकारत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान झाल्यानंतर चौथ्यांदा मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. येत्या १८ डिसेंबर रोजी (मंगळवारी) सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या दौऱ्याचा पक्षाला फायदा व्हावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून बारकाईने या दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. 

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ हे चार लोकसभा आणि पुणे शहरातील आठ आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन, असे अकरा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांनीही यासाठी बैठकांचे सत्र सुरु ठेवले असून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या अध्यक्षांकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. तीस हजार नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याची जबाबदारी पदाधिकऱ्यांना देण्यात आली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होर्डिंग्जवर भर देण्यात आला आहे. कार्यक्रम श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात असला तरी दोन्ही शहरांत वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुरु आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याची गांभीर्याने तयारी पक्षाच्या पातळीवर सुरु आहे. पुणे आणि पिंपरी शहरात शतप्रतिशत भाजप असले तरी बदलत्या 'वाऱ्या'चा या मतदारसंघांवर परिमाण होऊ नये, याकडे पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे.

या संदर्भात `सरकारनामा`ला माहिती देताना पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ''पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्प्या असून पुण्यात आता मेट्रोची तिसरी फेज सुरु होत आहे. अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून तीस हजार नागरिकांना कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याचे नियोजन आहे. या संदर्भात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आज नगरसेवकांना प्रत्यक्ष सूचना देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत.``

संबंधित लेख