`भाजपच्या जागा कमी होणार; पण सत्तेवर `एनडीए`च येणार`

`भाजपच्या जागा कमी होणार; पण सत्तेवर `एनडीए`च येणार`

पुणे : सुरवातीच्या काळात एकतर्फी वाटणारी निवडणूक आता काही प्रमाणात चुरशीची झाली असली तरी विरोधकांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत समर्थ नेतृत्व नाही. तरीही या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जागा गेल्यावेळच्या तुलनेत चाळीस ते साठने कमी होतील. मात्र, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता येण्याची शक्‍यता अधिक आहे, असे मत राजकीय अभ्यासक प्राध्यापक सुहास पळशीकर यांनी सांगितले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. निवडणुकीचा प्रचार, सर्व्हेक्षण व सध्याची राजकीय स्थिती या विषयावर त्यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, " गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांची लाट होती, असा प्रचार करण्यात आला. मात्र, अशाप्रकारची कोणतीही लाट नव्हती. इंदिरा गांधी यांच्यानंतर कॉंग्रेस देशासमोर समर्थ नेतृत्व उभे करू शकली नाही. या वातावरणाचा फायदा मोदी यांनी घेतला. एका समर्थ नेतृत्वाच्या रूपाने ते देशाच्या जनतेसमोर गेले. लोकांनी त्यांचा पर्याय निवडला. त्यात लाट वगैरे काहीही नव्हते. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीतही राहूल गांधी यांचे नेतृत्व मोदी यांच्यासमोर समर्थपणे टिकत नाही. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी यांच्या मागे उभी राहण्याची शक्‍यता अधिक आहे.

``गेल्या काही दिवसात कॉंग्रेसची परिस्थिती सुधारली असली तरी कॉंग्रेस फार मोठी मजल मारेल, अशी स्थिती नाही. मात्र, उत्तरप्रदेशात भाजपाची होणारी मोठी पिछेहाट त्यांना पश्‍चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये, आरिसा येथून भरून काढण्याचा प्रयत्न राहील. मात्र, या राज्यात उत्तर प्रदेशातील पिछेहाट भरून काढण्याएवढे यश भाजपाला मिळणे अशक्‍य आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच इतर राज्यात मिळून भाजपाच्या चाळीस ते साठ जागा कमी होतील. यापैकी पंधरा ते वीस जागा पूर्वोत्तर राज्ये, पश्‍चिम बंगाल व ओरिसा या राज्यातून भरून काढण्यात यश मिळेल. तरीही भाजपाला किमान चाळीस जागा कमी पडतील. त्यामुळे सत्तेवर येण्यासाठी या चाळीस जागांची मदत नितीशकुमार, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर कॉंग्रेस हे मदत करतील, असे पळशीकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com