lokhande-shirdi-final
lokhande-shirdi-final

भाजपचे ऑपरेशन शिर्डी :  असे चाललेय बूथ मॅनेजमेंट

ज्यांना भविष्यात पक्षात करिअर करण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांतून प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी एक विस्तारक नेमण्यात आला.

शिवसेनेच्या शिर्डीत भाजपची जोरदार फिल्डींग

शिर्डी : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या साखर सम्राटांचे प्राबल्य असलेल्या आणि सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. भाजप राज्यातील अनेक मतदारसंघात किती बारकाईने संघटनात्मक बांधणी करीत आहे याचे उदाहरण म्हणून शिर्डीतील मोर्चेबांधणीकडे पाहता येईल.

प्रत्येक लोकसभा मतदार संघाला स्वतंत्र विस्तारक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांतून एक प्रभारी नियुक्त केलेला आहे. भाजपने शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र विस्तारक म्हणून विजय साने यांची नियुक्ती केलेली आहे. तर नेवासे येथील नितीन दिनकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून विजय साने यांचे मायक्रोप्लॅनिंग सुरू आहे. बैठकांचा धडाका सुरू आहे. प्रत्येक बुथपर्यंत आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा उभी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. पक्षाने अद्याप उमेदवार ठरविलेला नाही. भाजपमध्ये दहा-वीस वर्षे काम करून खासदारकीसाठी तयार झालेला उमेदवार नाही. जे भाजपतर्फे इच्छुक आहेत त्यांनाही ह्या पूर्व तयारीच्या नियोजनात समाविष्ट न करता स्वतंत्रपणे काम सुरू आहे. उमेदवार नसतानाही अन्य सर्व तयारी कशी करता येते याचा नमुना शिर्डीत पाहायला मिळतो.

दोन दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या बैठकीत या मतदार संघाचे पक्षाचे प्रभारी विजय साने यांनी मतदारसंघातील तालुकाध्यक्ष व विस्तारकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बुथरचनेचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वातावरण निर्मिती करण्याची पक्षाची रणनीती आहे. त्यादृष्टीने येत्या काळात हाती घ्यायच्या विविध संपर्क अभियानाची माहिती या बैठकीत देण्यात आली.

या निमित्ताने संकलित झालेल्या माहिती नुसार पक्षाने सर्व सोळाशे बूथवर भाजपने बुथप्रमुख निश्‍चित केले आहेत. त्यातील बहुतेकांना प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक बूथवर तीस प्रतिनिधी नेमण्याचे काम सुरू आहे. त्याचा दैनंदिन आढावा थेट मुंबईतील वॉर रूम मधून घेतला जात आहे. बूथ रचना पूर्ण झाली की या सर्व बूथ प्रमुखांचा मेळावा कोपरगाव येथे घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मतदार यादीच्या प्रत्येक पानावरील मतदारांसाठी पेज प्रमुख नेमला जाईल. गुजरात निवडणुकीमध्ये हे पद 'पन्ना प्रमुख' नावाने गाजले होते. बूथ प्रमुख ते पेज प्रमुख या माध्यमातून संघटनेच्या बळावर सर्वाधिक मतदारांपर्यंत पोचण्याची रचना तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

ज्यांना भविष्यात पक्षात करिअर करण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांतून प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी एक विस्तारक नेमण्यात आला. या शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी अनुलोम संस्थेच्या माध्यमातून एक पूर्णवेळ प्रतिनिधी प्रत्येक विधानसभा मतदार संघात कार्यरत आहे. हे विस्तारक आणि प्रतिनिधी दररोज च्या कामकाजाची माहिती मुंबईत उभारण्यात आलेल्या वॉर रूमला देत असतात. तेथून या कामाच्या माध्यमातून दिलेली माहिती व नावे याची शहानिशा देखील केली जाते.

वेगाने सुरू असलेले संघटनात्मक बांधणी चे काम पूर्ण झाले की मिस्ड कॉलच्या माध्यमातून झालेले सभासद, पक्षाचे सहानुभूतीदार व मतदार यांच्या घरांच्या भिंतीवर कमळाचे चिन्ह लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल. तर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या घरावर झेंडे लावून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वातावरण निर्मिती करण्याचे नियोजन असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com