BJP's domination in Dhule | Sarkarnama

धुळ्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

धुळे येथील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसह आपल्या पक्षाविरुद्धच बंडाळी करून स्वतंत्र पॅनल देणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाची अक्षरशः धुळधाण केली.

धुळे : येथील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसह आपल्या पक्षाविरुद्धच बंडाळी करून स्वतंत्र पॅनल देणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाची अक्षरशः धुळधाण केली. मतदारांनी निर्विवादपणे निवडणुकीतील एकूण 74 पैकी 50 जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. त्यातून एकाच पक्षाच्या हाती बहुमताने सत्ता देणारी ही ऐतिहासिक निवडणूक ठरली आहे. 

महापालिका निवडणुकीत 19 प्रभागांतील समाजवादी पक्षाची एका बिनविरोध महिला उमेदवार वगळून 354 उमेदवारांसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. तत्पूर्वी, रविवारी सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. कमी मतदान कुणाच्या पथ्यावर पडते, याविषयी उत्सुकता होती. 

मतमोजणीनंतर निकाल हाती येताच महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस, लोकसंग्राम पक्ष, शिवसेनेला मोठा धक्का बसला. भाजपने निवडणुकीत दिलेल्या 62 पैकी 50 जागांवर विजय मिळविला. पालिका स्थापनेच्या इतिहासात कुठल्याही पक्षाला इतक्‍या बहुमताने आजपर्यंत विजय संपादन करता आलेला नव्हता. निकालानंतर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना डोक्‍यावर घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

पक्षनिहाय जागांची स्थिती 
महापालिकेतील मावळते सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आठ, कॉंग्रेसला सहा, समाजवादी पक्षाला दोन, बसपला एक, शिवसेनेला एक, लोकसंग्राम पक्षाला एक, अपक्षाला एक जागा मिळाली. यात "एमआयएम'ने चार जागांवर विजय मिळवत महापालिकेत प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ तीन नगरसेवक होते. असे असताना बारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीला मतदारांनी दूर करत विकासाच्या मुद्यावर भाजपवर विश्‍वास व्यक्त केल्याचे निकालातून समोर आले. 

शहर विकासाची जबाबदारी
या विजयानंतर आमच्यावर धुळे शहर विकासाची जबाबदारी वाढली असून, जाहीरनाम्याप्रमाणे शहराला वर्षभरात रोज पिण्याचे पाणी देण्यासह विविध आश्‍वासनांची पूर्ती करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्री डॉ. भामरे, महाजन, रावल यांनी सांगितले. 

संबंधित लेख