BJP's 50 MLA's in Danger Zone | Sarkarnama

बीड जिल्ह्यातल्या भाजप नेत्यांत कोण 'डेंजर झोन' मध्ये? कोण कर्तबगार?

दत्ता देशमुख 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पक्षाने एका संस्थेकडून केलेल्या पाहणीत राज्यातील ५० आमदारांसह सहा खासदार  ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे समोर आले आहे. या यादीत बीड जिल्ह्यालाही ‘मान’  मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि डेंजर झोनमधल्यांच्या  समर्थकांत राजकीय भीतीही पसरली आहे.

बीड : भाजपने एका संस्थेकडून केलेल्या पाहणीत पक्षाचे राज्यातील ५० आमदारांसह सह खासदार ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे समोर आले. ‘आम्ही तरी का मागे’ असे म्हणत या डेंजर झोनच्या यादीत बीडमधील भाजप नेत्यांनीही चांगली जागा पटकावली आहे. त्यामुळे ‘डेंजर झोन’ यादीत बीडचे कोण आणि त्यांचे पुढे काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.

दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचे धनी बनलेले केंद्र आणि राज्य सरकारकडून जनमताची चाचपणी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षानेच एका संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणात, भाजपचे राज्यातील सहा खासदार आणि जवळपास ५० आमदारांच्या जागा निवडणुकीत 'डेंजर झोन'मध्ये असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही गोष्टीत ‘आम्ही पुढे आणि आमच्यामुळेच..’ असे म्हणणाऱ्या जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींनी या ‘डेंजर झोन’च्या यादीतही आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, आगामी निवडणुकांत या मंडळींना भाजपकडून उमेदवारी मिळणार का, उमेदवारी मिळाली तर काय होणार, अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. 

दरम्यान, दिवंगत नेते  गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत  त्यांच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला. केंद्रीय निधीतील  महामार्गांसह अहमदनगर - बीड - परळी या लोहमार्गांची कामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी त्या नियमित संपर्काचा अभाव ही त्यांची उणीव आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी मोदी लाट आणि दिवंगत मुंडेंची सहानूभुती या कारणांनी विजयी उमेदवारांचे मताधिक्क्य त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक होते. मात्र, लाट ओसरली तरी काही आमदारांच्या डोक्यातही हवा कायम राहिली. त्याचाच परिणाम स्थानिक कामगिरीवर झाला. मागच्या वेळी केज आणि धारुर या दोन तालुक्यांनाच पिक विम्यातून वगळण्यात आले. 

धारुर हे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांच्या मतदार संघातील असून केज संगीता ठोंबरेंचा मतदार संघ आहे. अगोदरच दुष्काळ आणि पुन्हा विम्यातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी पसरली. हे कमी की काय म्हणून आता पावसाच्या उघड आणि रोगराईमुळे खरीप पिकांचा खराटा झालेला असताना या दोन तालुक्यांसह इतर काही तालुक्यांची नजनी आणेवारी ५० हून अधिक दाखविली आहे. त्यामुळे दुष्काळी मदत मिळण्यास अडचणी आहेत. 

मात्र, घाबरु नका.... एवढाच सल्ला दोन्ही आमदार देत आहेत. तर, परळीतही मागच्या वेळीही इतर भाजप उमेदवारांचे मताधिक्क्य ६० ते ४० हजारांच्या दरम्यान असताना पंकजा मुंडेंचे मताधिक्य तुलेनेने कमी होते. त्यात पुन्हा नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत भाजपची पिछेहाट झाली. दरम्यान, भाजपच्या ‘डेंजर झोन’यादीत जिल्ह्यातील तीन आमदारांसह खासदारांचा समावेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आली. त्यामुळे ‘समोर कोणीही आले तरी बळीचा बकरा’ अशी राष्ट्रवादीची हेटाळणी करणाऱ्या भाजपवर सोशल मिडीयातून हल्ला चढविण्याची आयती संधीच राष्ट्रवादीला मिळाली. मागच्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर राष्ट्रवादी समर्थक हीच बातमी व्हायरल करुन भाजपला आव्हान देत आहेत.

संबंधित लेख