शिवसेना-भाजप निम्म्या जागांवर लढणार! मग भाजपचे 25 आमदार निवडणुकीआधीच घरी जाणार!!

भाजप आणि शिवसेना युतीत लोकसभेचे जागावाटप सोपे आहे. खरी कसोट विधानसभेच्या जागावाटपात लागणार आहे. 2009 प्रमाणे की 2014 मधील विजयानुसार वाटप करायचे, हा मोठा पेच आहे.
शिवसेना-भाजप निम्म्या जागांवर लढणार! मग भाजपचे 25 आमदार निवडणुकीआधीच घरी जाणार!!

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लवकरच "मातोश्री'वर येणार आहेत.

दोन्ही पक्षांना लोकसभेच्या जागावाटपात फारशी अडचण येणार नाही. लोकसभेच्या जागाही सध्यानुसारच ठरविणे सोपे होणार आहे. कदाचित एक-दोन जागांची अदलाबदल होऊ शकते. मात्र विधानसभेसाठी जागावाटप अधिक कौशल्याने करावे लागणार आहे. कारण भाजपने सध्या जिंकलेल्या काही जागांवर भाजपने दावा केला आहे. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या चार शहरांत शिवसेनेला आपल्या हक्काच्या पण गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या जागा हव्या आहेत.

भाजपने 122 जागा गेल्या निवडणुकीत जिंकल्या. या जिंकलेल्या जागा भाजपकडेच राहतील, असा त्या पक्षाचा दावा आहे. शिवसेनेला मात्र 2009 च्या निवडणुकीनुसार जागावाटप हवे आहेत .  तसे झाले तर भाजपचे तब्बल 25 आमदार जागावाटपातच घरी जाण्याची शक्यता आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीपासून शिवसेनेने या जागेची मागणी केल्याने भाजपने पालघरच्या जागेवरही पाणी सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय विधानसभेच्या जागावाटपावरही बोलणी झाल्याचे समजते. विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत भाजप अध्यक्ष अमित शाह "मातोश्री'वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जाते. 

भेटीनंतर शिक्कामोर्तब? 
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. भाजप युतीसाठी आग्रही आहे. मात्र शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांनी सोडली नाही. युतीबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंपासून सर्वच शिवसेना नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला. मात्र भाजप नेत्यांनीही युती होणार असा विश्‍वास वारंवार व्यक्त केला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत युतीची घोषणा झाली, तर या युतीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यापासून युतीवर शिक्‍कामोर्तब झाल्याचे मानण्यात येते. 

ही आहे शक्‍यता 
लोकसभेसाठी 
भाजप : 25 
शिवसेना : 23 

विधानसभेसाठी 
भाजप : 144 
शिवसेना : 144

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com