BJP is world`s largest political party : Patil | Sarkarnama

भाजप म्हणे जगातील सर्वात मोठा पक्ष! : चंद्रकांत पाटील यांचा दावा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पक्षाला डाग लागणार नाही, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे सध्या भाजप कार्य़कर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. या उंचावलेल्या मनोबलाचा पक्षाला किती फायदा होणार, हे आगामी काळात कळेलच.

कऱ्हाड : ""देशात अकरा कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तर आहेतच त्याशिवाय चौदा ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री अाहेत. चार राज्यांत भाजपचे आघाडी सरकार आहे. अशा मोठ्या पक्षाचे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाला आहात. याचा अभिमान बाळगा,"" असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. 

ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या भाजपच्या सरपंच व सदस्यांचा सत्कार महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रात्री कऱ्हाडात झाला. या वेळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, सागर शिवदास, जितेंद्र पवार, हिंदुराव चव्हाण, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून सरपंच व सदस्यांनी काम करावे. पाच वर्षे काम केले नाही तरी चालेल अशी मानसिकता केल्यास लोक पुन्हा निवडून देणार नाहीत. याचेही भान ठेवावे. भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकांना माहिती आहे. जे दिवसांतील बावीस तास काम करतात. त्यामुळे काम करणारी माणसं म्हणून भाजपकडे लोक पाहतात. त्यासाठी लोकांना अधिकाधिक न्याय दिला पाहिजे.'' 

""शासनाच्या महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. लोकसंख्येच्या दहा टक्के भाजपची सदस्य संख्या आहे. त्यामुळे देशातील अकरा कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे भाजपचे पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती तर आहेतच. त्याशिवाय देशात चौदा ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत चार ठिकाणी भाजपचे सरकार आहे. अशा मोठ्या पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य तुम्ही झाला याचा अभिमान बाळगा, या पक्षाला डाग लागणार नाही याची काळजी घ्या. भाजपने ग्रामपंचायतीला मोठा अधिकार दिले आहेत. थेट निधी तसेच योजना ग्रामपंचायतीला दिली आहेत त्याचा लाभ जनतेला मिळवून द्यावा,'' असे आवाहन चंद्रकांतदादांनी केले. 

संबंधित लेख