BJP won narrowly in Gujarat , lost in Karnataka : Rahul Gandhi | Sarkarnama

ते गुजरातेत वाचले , कर्नाटकात हरले आता राजस्थानात दिसणारही नाहीत : राहुल गांधी 

सरकारनामा  
मंगळवार, 12 जून 2018

भाजपवाले  गुजरातमध्ये  कसेबसे वाचले, कर्नाटकात हरले, मात्र  मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकात  दिसणारही नाहीत . 

- राहुल गांधी

मुंबई : "भाजपवाले  गुजरातमध्ये  कसेबसे वाचले, कर्नाटकात हरले, मात्र  मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकात  दिसणारही नाहीत," अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर आज हल्ला  चढवला . 

गोरेगाव येथे काँग्रेस पक्षाच्या  मुंबईतील बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात राहूल गांधी यांनी अनौपचारिक शैलीत  संवाद साधला.  

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले , गुजरात, कर्नाटकमध्ये जे झाले तेच भारतात आणि महाराष्ट्रात होईल . काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपला पराभूत करून २०१९ मध्ये सत्तेत येतील . 35 हजार कोटींचा घोटाळा करून पळून जाणाऱ्या निरव मोदीला पंतप्रधान भाई म्हणतात याकडे लक्ष वेधाताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींवर बोला, मोदींवर बोला अशी मागणी सुरू केली. या उत्स्फूर्ततेला प्रतिसाद देत राहूल गांधी यांनी तेही ( नरेंद्र मोदी ) पळून जातील असे विधान केले.  लोकसभेच्या निकालांची जाणीव झाली असल्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा घाबरले आहेत, असेही ते म्हणाले. 

 श्रीमंत मंडळींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार हे देशातील केवळ श्रीमंतांचे रक्षण करतात. मोदी म्हणायचे मी चौकीदार आहे, मात्र ते जनतेचे नव्हे, तर काही श्रीमतांचे चौकीदार आहेत .  

कार्यकर्ता हाच कॉंग्रेसचा खरा सेनापती आहे. तोच पक्षाला विजयी करेल.  असत्य बोलणाऱ्या या सरकारला खाली खेचावे .   आरएसएस विरोधातील विचारांची लढाई आपण कायम ठेवू असे नमूद करत स्वातंत्र्य सावरकर यांनी ब्रिटीश सरकारकडे माफी मागितली होती, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र कधीही माफी मागीतली नाही,  असा उल्लेखही त्यांनी केला.  

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले ," मुंबईतील मेट्रो, मोनोची कामे आम्ही सुरू केली. भाजप श्रेय घेते आहे. "

या मेळाव्यात  आस्लम खान आणि एकनाथ गायकवाड यांची भाषणे झाली. मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रास्ताविक केले. 

संबंधित लेख