BJP will corner Shivsena after diwali | Sarkarnama

शिवसेनेवर कुरघोडीच्या योजना; भाजपचे फटाके दिवाळीनंतर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

मुंबई महापालिकेत शिवसेनेला खिंडीत पकडण्याची योजना भाजपने आखली खरी. मात्र उद्धव ठाकरे यांनी मास्टर स्ट्रोक लगावत भाजपचे मनसुबे उधळून लावले आहेत. आता शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या विविध योजनांवर भाजप काम करत आहे. त्यामुळे भाजपचे फटाके दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता आहे.

पुणे : मनसे नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आत्मविश्‍वास वाढलेल्या शिवसेनेने मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत भाजपने मौन पाळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय ते ठरवतील, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

स्वीडन दौऱ्यावरून परतलेले मुख्यमंत्री ताज्या घडामोडींची माहिती घेत आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवक गळाला लावून भाजप मुंबईचे महापौरपद काबीज करू शकतो. दुसरीकडे शिवसेनेने मध्यावधीची भाषा सुरू केली असली तरी त्यांचे 30 आमदार भाजपच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जाते. नारायण राणे यांच्या एनडीए प्रवेशानंतर ते यात भाजपला काय सहकार्य करणार, याकडे लक्ष आहे. मुंबई काॅंग्रेसचे नगरसेवक फोडण्यात राणेंना यश येणार का, यावर आता पुढील मनसुबे ठरू शकतात. मात्र सध्या काॅंग्रेससाठी सध्याचे दिवस बरे असल्याने त्यात कितपत यश येईल याची शंकाच आहे. 

भाजप या आधी आम्ही कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुकीला तयार आहोत, असा दावा करत होता. मात्र नांदेड महापालिका आणि गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप आमदारही मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास सहजासहजी तयार होण्याची शक्यता नाही.  

त्यामुळे शिवसेनेला लगेच आव्हान देण्याच्या तयारीत सध्या भाजप नाही.  योग्य वेळेची वाट पाहण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तरी दिवाळीनंतर आणखी काही राजकीय फटाके फुटण्याची शक्यता आहे. हे फटाके मुंबई महापालिकेपुरते किंवा राज्यभरासाठीचे असू शकतात, असाही दावा करण्यात येत आहे.

दरम्यान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेने मनसेची फोडाफोडी करण्यासाठी पैसे कुठून आणले, याची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडे केली आहे. शिवसेनेला पैसा कोणी पुरवला, त्या फर्मचे नावही या पत्रात दिले आहे. या फर्मच्या विरोधात या आधी मनी लाॅंडरींगबद्दल कारवाई झाल्याची माहिती त्यांनी या तक्रारीत दिली आहे. आता राजकीय पातळीवर शिवसेनेला नमवायचे आणि त्यासाठी शासकीय यंत्रणांकडे तक्रारी दाखल करण्याचे धोरण भाजपने आखल्याचे यातून दिसून येत आहे.

 

संबंधित लेख