bjp waits for sadabhau | Sarkarnama

"स्वाभिमानी'तून खोतांच्या हकालपट्टीची भाजपला प्रतिक्षा ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जून 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खासदार राजू शेट्टी व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदाने टोक गाठले आहे. त्यामुळे श्री. खोत यांना संघटनेतून काढून टाकण्याचे संकेत शेट्टी यांनी दिले आहेत. तर ही कारवाई शेट्टी कधी करतात, याची प्रतिक्षा भाजपकडून सुरु आहे.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खासदार राजू शेट्टी व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदाने टोक गाठले आहे. त्यामुळे श्री. खोत यांना संघटनेतून काढून टाकण्याचे संकेत शेट्टी यांनी दिले आहेत. तर ही कारवाई शेट्टी कधी करतात, याची प्रतिक्षा भाजपकडून सुरु आहे. त्यानंतर भाजपकडून पुढची चाल खेळली जाईल. 

सदाभाऊ-शेट्टी यांच्यातील मैत्रीचे अतुट नाते काल-परवापर्यंत कायम होते. अगदी वैयक्तीक सुखदुःखातही हे दोघे एकत्र राहीले. मी खासदार नसलो तरी मला मिळणारी पेन्शन दोघे वाटून घेऊन उदरनिर्वाह करू, असे श्री. शेट्टी आपल्याला म्हणाल्याचे श्री. खोत यांनीच एका ऊस परिषदेत जाहीर केले. जग इकडचे तिकडे होईल पण सदाभाऊ-शेट्टी ही दोस्ती कितीही वादळे आली तरी तुटणार नाही, असेही ते म्हणाले होते. पण गेल्या वर्षभरापासून नेमके उलटे होत आहे. 

लोकसभेचा निवडणुकीत शेट्टी महायुतीत सामील झाले. विधानसभेला त्यांनी भाजपला साथ दिली. मात्र भाजपने संघटनेला सत्तेत लवकर प्रतिनिधीत्व दिले नाही, तसेच शेतकरी प्रश्‍नांसंबंधी ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे शेट्टी सुरवातीपासून सरकारविरोधी भूमिका मांडत राहिले. संघटनेचे प्रतिनिधी म्हणून खोत यांना मंत्रीमंडळात स्थान दिलेतरी शेट्टी भाजपच्या ऐकण्यात आले नाहीत. त्यामुळे या दोघांत फूट पाडण्याची चाल भाजपकडून खेळण्यात आली. खोतांना मुख्यमंत्र्यांनी जवळ धरल्याने खोतांना संघटनेपेक्षा भाजप अधिक जवळचे वाटू लागले. शेट्टी सरकारविरोधी बोलत असताना खोत सरकारची बाजू मांडू लागले. यामुळे दोघांतील वाद वाढत गेले. 

दोन दिवसापुर्वी श्री. खोत यांनी वडीलांच्या आजारपणासाठी श्री. शेट्टी यांच्याकडून घेतलेले अडीच लाख परत दिल्याने हा वाद आता वैयक्तीक पातळीवर पोहचल्याचे सिध्द झाले. त्यातून आता पुन्हा एकदा या दोघांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. पण भाजपाचे नेते मात्र श्री. शेट्टी हे सदाभाऊंची संघटनेतून कधी हकालपट्टी करतात, याच्या प्रतिक्षेत आहेत. दुसरीकडे श्री. शेट्टी मात्र सरकारवर दबाव आणून राजकीय वजन कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी कोण निर्णय घेतेय, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 

संबंधित लेख