भाजपचे प्रवक्ते केशवराव उपाध्ये यांचा नवा शोध : शेतकरी संप फक्त दोन जिल्ह्यातच ! 

एका प्रश्नाच्या उत्तरात शिवसेना पक्षाचा नामोल्लेख न करता शायना एन .सी . म्हणाल्या ," 'बडा भाई' कोण आणि 'छोटा भाई' कोण हे ठरतं आपापल्या क्षमतेच्या आधारावर ! प्रत्येकाने हे समजून घ्यायला हवं."संजय राऊत यांनी जुलैत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे विधान केले आहे याकडे लक्ष्य वेधले असता त्या म्हणाल्या ,आम्ही कुठल्याही 'भूकंपाला' घाबरत नाही .
keshave-upadhya-shayan
keshave-upadhya-shayan

पिंपरी :  शेतकऱ्यांचा संप राज्यभर नसून फक्त नाशिक आणि नगर जिल्ह्यातच तो असल्याचे आगीत तेल घालणारे वक्तव्य याच पक्षाचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या .तीन वर्षांच्या काळात केंद्र सरकारने राबविलेल्या चांगल्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शायना एन . सी . यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती  त्यामध्ये श्री . उपाध्ये यांनी वरील विधान केले . 

राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाबाबत विचारणात आलेल्या विविध प्रश्नावर  बोलताना उपाध्ये  म्हणाले ,   "  शेतकऱ्यांचा संप राज्यभर नसून फक्त नाशिक आणि नगर जिल्ह्यातच आहे .  आधी नगर येथे शेतकरी नेत्यात फूट पडली . शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी कालच स्थापन झालेल्या दुसऱ्या कृती समितीतही आज फूट पडली आहे . 

शेतकऱ्यांच्या संपात सरकारने फूट पाडली काय असे विचारले असता  त्यांनी सरकारने अशी कोणतीही फूट पाडली नसल्याचे सांगितले . 

यावेळी शायना एन .सी . शेतकरी प्रश्नावर बोलताना म्हणाल्या ,"दोन्ही कॉंग्रेसच्या काळात सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाल्याने त्यांनी शेतकरी संपाचे भांडवल करून तो संप चिघळत ठेवला आहे .  महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची फूस असून या दोन्ही कॉंग्रेस राजकीय हेतूने ते भडकावीत आहेत . " 

आमच्या सरकारने अनेक नव्या योजना आणून शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आणल्या असे सांगून त्या  विविध प्रश्नांची उत्तरे देताना म्हणाल्या , "भारतासारख्या अवाढव्य देशात धोरण राबवताना काही चुका नक्की राहू शकतात, हे मान्य. शेतकरी आंदोलन होण्यात अशा काही चुका कारणीभूत ठरल्या असतीलही. पण, आमचा प्रयत्न सतत शेतकऱ्यांशी चर्चा आणि संवाद ठेवण्याचा आहे.  शेतकरी आंदोलना संदर्भात येत्या दोन दिवसांत निश्चित निर्णय होणारआहे . "
योगी सरकार ने उत्तरप्रदेशात दिलेल्या कर्जमाफीवर मात्र शायना एन सी यांनी बोलणे टाळले .   

पूर्वीच्या सरकार कडून कुठल्याही प्रकारचा संवाद जनतेशी नव्हता. आम्ही संवादी आहोत. मोदी सरकारने गेल्या तीन वर्षात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती देताना शायना म्हणाल्या ,"आज 'उज्ज्वला योजनेची' चर्चा सर्वाधिक होत आहे. 20 कोटी कुटुंबाना त्यामुळे गॅस जोडण्या मिळाल्या. महिलांना त्याचा फायदा झाला. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', 'सुकन्या समृद्धी योजना' या आमच्या योजना ही महिलांना सबल करणाऱ्या आहेत. आज याचा फायदा घेऊन अनेक क्षेत्रांत महिला सक्षम होत आहे .  मातृत्व रजा वाढवून देणं, हेही त्याच दिशेने जाणारं एक महत्वाचे पाऊल  आहे . "

" प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून 22 लाख तरुणांना रोजगार मिळाला. अशा अनेक योजना आमच्या 'ट्रेडमार्क' ठरल्या आहेत.  स्किल इकोसिस्टम निर्माण व्हावी, यासाठी स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना आणि अनेक नव्या उच्चशिक्षण संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे .  आज संशोधनासाठी तातडीने कर्ज उपलब्ध होऊ लागली आहेत.2012-13 मध्ये जीडीपी साडेपाच टक्के होता. आता तो साडेसात टक्क्यांवर जाऊन पोचला आहे."

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवून देणारे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा उल्लेख शायना यांनी "दबंग एमएलए'असा केला. पिंपरी-चिंचवडचा विकास देशात सर्वोत्कृष्ट असून येथे आल्यावर परदेशात आल्यासारखे वाटते, असे त्या म्हणाल्या.

 मात्र, हा विकास नुकत्याच सत्तेत आलेल्या भाजपच्या काळात झालेला नसून राष्ट्रवादीने केला असल्याने त्याचे श्रेय पक्ष का घेत आहे, अशी विचारणा करताच शायनांना समर्पक उत्तर देता आले नाही.

 सध्याचे राजकारण चुकीच्या मार्गावर चालले असल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानावर राष्ट्‍रवादीचेच राजकारण चुकीच्या मार्गाने   चालले आहे  असे त्या म्हणाल्या. 

 मात्र, शेतकरी संपाविषयीच्या त्यांच्या व उपाध्येंच्या वक्तव्यानंतर प्रश्‍नांची सरबत्ती होताच पुण्यात कार्यक्रम असल्याचे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद गुंडाळली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com