BJP Should Give Account Details about Adani-Ambani's Loan Waiver | Sarkarnama

भाजपने अडानी-अंबानींचा हिशेब द्यावा : नाना पटोले यांचे भातखळकरांना आव्हान 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

गेल्या चार वर्षात राज्याची अर्थव्यवस्थेची घडी बिघडल्याचा निष्कर्ष केंद्रीय वित्त आयोगाने काढला आहे. यावर भाजपचे प्रवक्ता आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याची अर्थव्यवस्था बिघडण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी कारणीभूत असल्याचा युक्तीवाद केला आहे.

नागपूर : ''शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने राज्याची अर्थव्यवस्था बिघडली म्हणाऱ्यांनी अडानी व अंबानींचे किती कर्जमाफ केले व त्यांच्या उद्योगांना किती कोटी रुपयांच्या सबसिडी दिल्या, याचा हिशेब आधी द्यावा," असे आव्हान काँग्रेसचे नेते व किसान-शेतमजूर काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी दिले आहे.

गेल्या चार वर्षात राज्याची अर्थव्यवस्थेची घडी बिघडल्याचा निष्कर्ष केंद्रीय वित्त आयोगाने काढला आहे. यावर भाजपचे प्रवक्ता आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याची अर्थव्यवस्था बिघडण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी कारणीभूत असल्याचा युक्तीवाद केला आहे. "आमदार भातखळकर यांनी नेमक्‍या किती शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली याची आकडेवारी द्यावी. फडणवीस सरकारची कर्जमाफी योजना केवळ फसवी असून या योजनेअंतर्गत केवळ 10 ते 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. अजूनही राज्य सरकारने नेमकी आकडेवारी जाहीर केलेली नाही. एवढ्याशा रक्कमेने राज्याची अर्थव्यवस्था बिघडली, हा तर्क समजण्यापलिकडे आहे," असा टोला पटोले यांनी हाणला. 

अडानी व अंबानी उद्योग समुहांचे करोडो रुपयांचे बुडीत कर्ज माफ केले. तसेच त्यांच्या उद्योगांना लाखो रुपयांची सबसिडी दिली आहे. याचा हिशेब भाजपने आधी जनतेला द्यावा, असे आव्हान पटोले यांनी दिले आहे. 

पीक विमा कंपन्याच गबर
शेतकऱ्यांना दुष्काळ स्थितीची मदत करण्यासाठी आणेवारी कायद्यात बदल करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत पटोले यांनी व्यक्त केले. आणेवारी काढण्याची पद्धत इंग्रजकालिन आहे. ही पद्धत शेतकऱ्यांच्या हिताची नाही. यामुळे पीक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्या गबर होत असल्याचा आरोप पटोले यांनी किले.

संबंधित लेख