BJP Shivsena Politics Bhandara Distric | Sarkarnama

बावनकुळे यांना 'भंडारा' जिल्ह्याचेही पालकत्व

सुचिता रहाटे
गुरुवार, 27 जुलै 2017

नागपूर बरोबर भंडारा जिल्ह्याचेही पालकमंत्री पद दिल्याने हा माझ्यावरचा अतिरिक्त भार नसून, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर दिलेली ही जबाबदारी आहे, असे मी समजतो.- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई :राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बाबवनकुळे यांच्याकडे नागपूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना भंडारा जिल्ह्याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर सोपवण्यात आला आहे. सेनेचे आरोग्य मंत्री दीपक सावंत हे पालकमंत्री असतानाही भंडारा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडे सोपविली आहे.

राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने पहिल्यांदाच सह पालकमंत्री नेमण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नाही असा आरोपही सेनेने केला होता. सेनेचे पालकमंत्री असलेल्या ठिकाणी भाजपच्या मंत्र्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यावरून सेनेमध्ये नाराजीचे सूर उमटण्याची चिन्हे आहेत.

नागपूर बरोबर भंडारा जिल्ह्याचेही पालकमंत्री पद दिल्याने हा माझ्यावरचा अतिरिक्त भार नसून, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर दिलेली ही जबाबदारी आहे, असे मी समजतो. भंडारा-गडचिरोली सारख्या जिल्ह्यात शेतकरी वर्ग जास्त असून त्या भागात शेतकऱ्यांचा विकास मला करायचा आहे. माझ्याबरोबर दीपक सावंत हे सुद्धा मला तेथील भागातील विकास करण्यासाठी हातभार लावतील, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना दिली.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगितले होते. बावनकुळे यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याने भाजपला शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. मुळात सत्तेत असून विरोधकांसारखी भूमिका बजावणाऱ्या सेनेवर यापूर्वी देखील फक्त फायद्यासाठीच सरकार मध्ये असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे शासनाच्या या निर्णयावर शिवसेना काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख