BJP Shiv sena government is promoting liquior : Sudhir Dhone | Sarkarnama

भाजपा-शिवसेना सरकार  महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवितय  :  डॉ.सुधीर ढोणे 

मनोज भिवगडे 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

.

अकोला  : व्यसनमुक्तींचे धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य असा नावलौकीक महाराष्ट्राने काँग्रेस सरकारच्या काळात मिळविला होता. मात्र भाजप-शिवसेना सरकारने दारू विक्रीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. दारू दुकाने उघडण्याची निश्चित केलेली सकाळी १० वाजताची वेळ बदलून भाजप सरकारने ती सकाळी ८ वाजता  केलेली आहे.

चहा पिण्याच्या वेळी दारू पिण्यास प्रोत्साहन देणारे भाजप-शिवसेना सरकारचे हे धोरण म्हणजे महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचे सरकारी प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे यांनी केली आहे. 

दारू व बियर बारला सरकारची मान्यता आहे व त्यातून मोठा महसूल मिळतो, अशी भूमिका घेत अहमदनगर येथील एका बियर बारचे उद्‍घाटन राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा.राम शिंदे व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले होते.

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असताना त्यांच्याच खात्याच्या राज्यमंत्र्यांनी दारूचे समर्थन करून राज्याचा नावलौकीक धुळीस मिळविला होता. दारूमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. दारूच्या आहारी जाऊन कफल्लक झालेल्याची मोठी संख्या आहे.

घरातील कर्ता व्यक्ती दारूच्या आहारी गेल्यास त्याचा फटका त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. मुलांबाळाची मोठ्या प्रमाणावर आबाळ होते. असे असताना गृहराज्यमंत्री व अर्थराज्यमंत्र्यांना त्याची अजिबात चिंता वाटत नाही, हे राज्य सरकारच्या संवेदनशून्यतेचे प्रतीक असल्याची टीकाही डॉ.सुधीर ढोणे यांनी केली आहे.
  
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ५०० मीटर अंतर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच अवैध वा अतिक्रमण केलेल्या जागेत बांधकाम केलेले धार्मिक स्थळे व मंदिरे पाडण्याचेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे कारण देत भाजपा सरकारने राज्यभरातील अनेक मंदिरे पाडलीत.  हिंदूंची मंदिरे पाडतांना जी तत्परता राज्य सरकारने दाखविली, तशीच तत्परता दारू दुकाने बंद करण्यासाठी दाखवायला हवी होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दारूची दुकाने बंद न करता ती पुनस्थापित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून राज्यातील भाजपा सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा (दारू) प्रिय असल्याचे सिध्द झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.

संबंधित लेख