BJP Sent Money in Foreign Countries before De-demonetization | Sarkarnama

नोटबंदीपूर्वी भाजपने आपला पैसा परदेशात पाठवला : पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

राज्यातील अन्‌ केंद्रातील सरकार सर्वाधिक भ्रष्ट आहे. मोदींच्या सरकारएवढे भ्रष्ट सरकार मी कधीच पाहिले नाही. त्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही उघडकीस आणली आहेत. मात्र, ते चौकशी करीत नाहीत - पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : "राज्यातील अन्‌ केंद्रातील सरकार सर्वाधीक भ्रष्ट आहे. मोदींच्या सरकारएवढे भ्रष्ट सरकार मी कधीच पाहिले नाही. त्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही उघडकीस आणली आहेत. मात्र, ते चौकशी करीत नाहीत. त्या चौकशीचे काय झाले ते कधीच उघड करीत नाहीत. नोटबंदीपूर्वी त्यांनी आपला पैसा परदेशात पाठवला. सोने, रिअल इस्टेटमध्ये गुंतवला. त्याचाच वापर ते करतात," असे आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "जुन्या रस्त्यालगत जागा नव्हती. त्यामुळे समृध्दी महामार्ग नवा केला जाणार होता. त्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालय वगळता कोणालाही माहिती नव्हते. या अधिकाऱ्यांनी प्रस्तावीत समृध्दी महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या. ते पुराव्यांसह आम्ही मांडले. नवी मुंबईत मध्यवस्तीतील दीड हजार कोटींची चौविस एकर जागा साडेतीन कोटींत भटीजा यांच्या पॅराडाईज बिल्डरला देण्यात आली. त्याचे सर्व पुरावे आम्ही मांडले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनीही आठशे कोटींचा भ्रष्टाचार केला. त्याची सर्व कागदपत्रे आम्ही सादर करुन विधीमंडळात मांडली. मी मुख्यमंत्र्यांना सांगून हे केले असे विधान या मंत्र्यांने केले. अशी अनेक प्रकरणे आहेत. मात्र, त्याची चौकशीच पूर्ण होत नाही. त्यात काय झाले हे उघड केले जात नाही." 

"असेच मोदी सरकारचेही आहे. राफेल विमान खरेदीत प्रचंड घोटाळा आहे. 580 कोटींचे विमान त्यांनी 1680 कोटींना खरेदी करुन त्यात सरळ छपस्तीस हजार कोटींचा घोटाळा घडला आहे. हे सरकार युपीए सरकारवर घोटाळ्यांचा आरोप करुन सत्तेवर आले आहे. त्यातील एकही भ्रष्टाचार झाला हे सिध्द झालेले नाही. या सरकारला 2014 मध्ये केवळ 31 टक्के मते मिळाली आहेत. 69 टक्के मते विरोधात होती. हे सर्व विरोधक आता एकत्र येणार असल्याने येत्या 2019 निवडणुकांत या सरकारला पायउतार व्हावेच लागेल." असेही चव्हाण म्हणाले. 

"मुंबईत रुळ ओलांडतांना दरवर्षी तीन हजार लोक प्राण गमावतात. देशात चौदा हजार लोक मृत्युमुखी पडतात. त्यावर उपाय केला जात नाही. मात्र, त्यांना लाख कोटीची बुलेट ट्रेन करायची आहे. मुंबईच्या एकानेही कधी आम्हाला अहमदाबादसाठी बुलेट ट्रेन हवी अशी मागणी केलेली नाही. मग बुलेट ट्रेनचा अट्टहास कशासाठी?," असा प्रश्‍न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख