BJP Sena Politics Ramdas Kadam | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

रामदास कदम यांचे पुन्हा पंख छाटले; प्रदुषण नियंत्रणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिलिंद म्हैसकर यांच्याकडे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 जुलै 2017

युती सरकार म्हणून झालेल्या विभागवार मंत्री आणि अधिकारपदानुसार राजकीय पक्ष म्हणून या पदावर पहिला दावा शिवसेनेचा असतानाही सेनेला यासाठी भाजपाने डावलेले आहे. म्हैसकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्‍त कार्यभार सोपवताना कदम यांना कोणतीही कुणकूण लागली नसल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम भलतेच संतापले असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बेताल वक्‍तव्ये करून शिवसेना विरोधातील सर्व रोष आपल्यावर ओढून घेणाऱ्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अधिकारावर भाजपाने पुन्हा गदा आणली आहे. मागील आघाडी काळापासून रिक्‍त असलेल्या महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदाचा सर्व कारभार आपल्याकडे मिळावा यासाठी वेळेवेळी मागणी करणाऱ्या कदम यांना या पदापासून कायम दूर ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत मर्जीतील समजले जाणारे मिलिंद म्हैसकर यांच्याकडे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे. यामुळे भाजपाने एकाच दगडात दोन बाण मारले असून या बाणामुळे एकीकडे रामदास कदम आणि दुसरीकडे शिवसेनाही घायाळ झाली असल्याचे बोलले जात आहे. तर यातून भाजपाने कदम यांच्या अधिकार काढून घेत आणि दुसरीकडे शिवेसेनेलाही मिळणाऱ्या अध्यक्षपदाचा अधिकार हिसकावून घेवून मोठी राजकीय कुरघोडी केली आहे.

राज्यात महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्षपद हे मंत्रीसमक्ष पद म्हणून ओळखले जाते. मात्र मागील अनेक वर्षांपासून हे पद रिक्‍त होते. त्या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार पर्यावरणचे प्रधान सचिव सतिश गवई यांच्याकडे होता. हे पद त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिले जाते. यात युती सरकार म्हणून झालेल्या विभागवार मंत्री आणि अधिकारपदानुसार राजकीय पक्ष म्हणून या पदावर पहिला दावा शिवसेनेचा असतानाही सेनेला यासाठी भाजपाने डावलेले आहे. म्हैसकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्‍त कार्यभार सोपवताना कदम यांना कोणतीही कुणकूण लागली नसल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम भलतेच संतापले असल्याचे सांगण्यात येते.

वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बेताल वक्‍तव्य करणे हे कदम यांना महागात पडले असले तरी यामुळे सेनेकडे येणारे महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्षपद हुकल्याने यावर येत्या काळात सेनेची नाराजीही उघड होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मंत्री कदम यांच्या अधिकारावरच पूर्ण टाच आणण्यासाठी ही खेळी केली असल्याचे शिवसेनेच्या गोटातून बोलेले जाते.

संबंधित लेख