bjp-sena future alliance in Pune | Sarkarnama

भाजप-सेनेतील युतीच्या चर्चेने पुण्यातील तीन आमदारांची झोप उडाली! 

ज्ञानेश सावंत
बुधवार, 13 जून 2018

पुणे : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा प्रेमाचे वारे सुरू झाले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या दोन्ही पक्षांत पुन्हा युती होण्याची शक्‍यता बोलावून दाखवली जात आहे. या शक्‍यतेने मात्र पुणे शहरातील तीन आमदारांची झोप उडाली आहे. हे तीन आमदार कोण असू शकतात, हे जागावाटपानंतरच स्पष्ट होणार असले तरी त्याची चर्चा आतापासूनच आहे. 

पुणे : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा प्रेमाचे वारे सुरू झाले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या दोन्ही पक्षांत पुन्हा युती होण्याची शक्‍यता बोलावून दाखवली जात आहे. या शक्‍यतेने मात्र पुणे शहरातील तीन आमदारांची झोप उडाली आहे. हे तीन आमदार कोण असू शकतात, हे जागावाटपानंतरच स्पष्ट होणार असले तरी त्याची चर्चा आतापासूनच आहे. 

भाजप नेते हे शिवसेनेसाठी त्याग करण्याची भूमिका मांडत आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये समेट घडल्यास विधानसभेला पुण्यातील राजकीय चित्र बदलण्याची शक्‍यता असून, विधानसभेच्या आठपैकी चार जागा पदरात पडण्याची आशा शिवसेनेला आहे. मात्र, याआधी जिंकलेले कोथरुड आणि हडपसर हे मतदारसंघ देऊन भाजप शिवसेनेची बोळवण करण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे, समान जागा वाटपावर शिवसेना अडून राहण्याची राहू शकते. तेव्हा भाजपची अडचण होण्याचा अंदाज आहे. 

आगामी निवडणुकीत दोन्ही एकत्र लढल्यास शिवसेना आपल्या जुन्या मतदारसंघांवर पुन्हा दावा सांगण्याच्या तयारीत आहे. त्यात, कोथरुडसह, शिवाजीनगर, हडपसर, वडगावशेरी हे मतदारसंघ ताब्यात घेऊन उर्वरित कसबा, पर्वती, खडकवासला, कॅन्टोमेंट भाजपला सोडण्याची शिवसेनेची व्यूहरचना असेल. परंतु, आजघडीला आठही मतदारसंघात आपले वर्चस्व असल्याने भाजप शिवसेनेला चार जागा देईल, असे वाटत नाही. 

पुण्यात 2004 निवडणुकीपर्यंत सहा विधानसभा मतदारसंघ होते. तेव्हा, भाजप-शिवसेनेची युती असल्याने दोन्ही पक्षांकडे तीन-तीन जागा होत्या. त्यात, शिवाजीनगर, भवानी पेठ आणि कॅन्टोमेंट मतदारसंघ शिवसेनेकडे होते. तर, कसबा पर्वती आणि बोपोडी भाजपच्या वाट्याला आले होते. पुढे 2009 च्या निवडणुकीत आठ मतदारसंघ झाल्याने युतीत कोथरुड, हडपसर, वडगावशेरी आणि कॅन्टोमेंटमध्ये शिवसेनेचे तर, कसबा, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासल्या भाजपचे उमेदवार होते. 

2014 च्या निवडणुकीत युती तुटल्याने दोन्ही पक्षाने आठही मतदारसंघात आपापले उमेदवार उभे केले. या निवडणुकीत कोथरुड, पर्वती, हडपसर आणि वडगाव शेरीत शिवसेनेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये युती झाल्यास शिवसेनेला हे मतदारसंघ मिळण्याची आशा आहे. युती तुटल्यामुळेच भाजपला पुण्यात घवघवीत यश मिळाले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याची पक्षाची तयारी सुरू असतानाच युतीची चर्चा सुरू झाल्याने भाजप कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. 

लोकसभा निवडणुकीत भाजप मोठा तर, विधानसभेसाठी शिवसेनेला मोठा भाऊ हे गाणित सेनेचे नेतृत्त्व मांडण्याची शक्‍यता आहे. ते सोडविताना भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आक्रमकता लक्षात शिवसेना आपल्या भूमिका ठाम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यात युती झाल्यास जागावाटपावरून दोन्ही जागावाटपारून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. 

यात शिवसेना ही कोथरूड, हडपसर आणि वडगाव शेरी या तीन मतदारसंघासाठी जास्तच आग्रही राहू शकते. वडगाव शेरी वगळता या दोन्ही ठिकाणी शिवसेनेकडे माजी आमदार आहेत. वडगाव शेरीत पक्षाच्या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ घटलेले असले तरी सध्या उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साहित करण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांतील युती झाल्यास भाजपला पुण्यात त्याग करावा लागण्याची शक्‍यता आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख