BJP protest against Sena in Jalgaon ZP | Sarkarnama

जळगाव महापालिकेत पाणीप्रश्‍नावर भाजप आक्रमक - शिवसेनाप्रणित आघाडीच्या विरोधात घोषणा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जून 2017

पाणी प्रश्‍नाबाबत एवढीच कळकळ होती तर सभा सुरू होण्यापूर्वी माझ्या दालनात चर्चा करायची होती. आज शहरात पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. मनपाचे कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून पाणी पुरवठा सुरळीत केला. त्याचे कौतूक करणे सोडून विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी राजकारण करीत आहेत.- डाॅ. वर्षा खडके

जळगाव - जळगाव शहरात गेल्या सात दिवसापासून पाणी टंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी अक्षरश: भटकंती करावी लागत आहे. त्यावरून विरोधी भाजपने आज स्थायी समिती सभेत आक्रमक भूमिका घेत सभापतीच्या आसनमोर जावून सत्ताधारी शिवसेना प्रणित खानदेश विकास आघाडीच्या विरोधात घोषणा दिल्या.

स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा सुरू होताच विरोधी भाजपच्या सदस्यांनी पाणी टंचाईवर चर्चा करण्याची मागणी केली.सभापतीनी त्याला नकार दिला. यावेळी भाजपचे सदस्य पृध्वीराज सोनवणे, उज्वला बेंडाळे, अपक्ष सदस्य नवनाथ दारकुंडे यांनी सभापतीच्या आसनासमोर ठिय्या देवून घोषणा दिल्या. या घोषणाच्या गदारोळात सभापती वर्षा खडके यांनी विषयावरील कामकाज सुरूच ठेवले. सर्व विषय मंजूर केले. तर विरोधकांनी पाणी टंचाईवर चर्चा करण्यात यावी अशी मागणी कायम ठेवली. सत्ताधाऱ्यांना पाठींबा देणारे मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसचाही भाजपच्या सदस्यांनी निषेध केला. यावेळी अवघ्या दहा मिनीटात सभा गुंडाळून सभापती खडके सभागृहातून निघून गेल्या.

सत्ताधाऱ्यांना गांभिर्य नाही
सभेनंतर भाजपतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मनपा विरोधी गटनेते सुनील माळी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, उज्वला बेंडाळे, नवनाथ दारकुंडे उपस्थित होते. एक्‍सप्रेस फिडर असतानही विद्युत पुरवठा कसा बंद राहिला?, असा असा प्रश्‍न उपस्थित केला. महावितरणवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी केली. तसेच पहिल्या पावसात पाणी वितरणाची स्थिती झाली. त्यावर उपाय योजना व्हावा यासाठी सभागृहात आधी चर्चा करायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी केली. सत्ताधारीपक्ष गेल्या दोन सभांपासून सभा गुंडाळण्याचे काम करीत असल्याचा थेट आरोप केला उज्ज्वला बेंडाळे यांनी केला. तसेच दारकुंडे यांनी आजही अनेक नागरिकांना पाणी मिळाले नसल्यचा आरोप केला.

केवळ प्रसिध्दीसाठी राजकारण : खडके
सभा संपल्यानंतर सभापती डॉ. वर्षा खडके पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ''पाणी प्रश्‍नाबाबत एवढीच कळकळ होती तर सभा सुरू होण्यापूर्वी माझ्या दालनात चर्चा करायची होती. आज शहरात पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. मनपाचे कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून पाणी पुरवठा सुरळीत केला. त्याचे कौतूक करणे सोडून विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी राजकारण करीत आहेत.'' आरोप केला. नैसर्गिक आपत्तीमूळे हा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. नागरिकांना तात्काळ पाणी देण्याचे काम मनपाने केले. सभेत विषय पत्रिकेवर पाणी प्रश्‍नाबाबत बोलण्याची परवानगी दिली जाणार होती. विषय पत्रिकेवरील विषय महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख