BJP politics | Sarkarnama

भाजपला एकटे पाडण्याचा प्रयत्न? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

शेतकरी आंदोलनाच्या आडून भारतीय जनता पार्टीला एकटे पाडण्याचा प्रयत्न विरोधकांतर्फे केला जात आहे. विदर्भातील आंदोलनामध्ये भाजपवगळता सर्व पक्षांचे कार्यकर्ते व नेते सहभागी होत आहेत. 

नागपूर : शेतकरी आंदोलनाच्या आडून भारतीय जनता पार्टीला एकटे पाडण्याचा प्रयत्न विरोधकांतर्फे केला जात आहे. विदर्भातील आंदोलनामध्ये भाजपवगळता सर्व पक्षांचे कार्यकर्ते व नेते सहभागी होत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातून आता राजकीय धूर निघू लागला आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे आहे, असा किती सांगितले जात असले तरी राजकीय पाठबळाशिवाय हे होऊ शकत नाही. या निमित्ताने आता विरोधकांची मोट बांधण्याची संधी विरोधकांना यात प्रामुख्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन करण्यात आली आहे. यात भाजपवगळता सर्व राजकीय पक्षांचे नेते आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील केवळ मारेगाव व झरीजामणी तालुके वगळता सर्वच तालुक्‍यांमध्ये शेतकरी आंदोलन झाले. यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. 

वर्धा जिल्ह्यातही हाच प्रयोग झाला. हिंगणघाट येथून हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर रस्ता रोको करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार राजू तिमांडे यांनी केले. परंतु यात सर्व पक्षाचे नेते सहभागी झाले होते. जवळपास दीड तास हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग बंद होता. गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात इतर पक्षांच्या नेत्यांनी आंदोलन केले. 

अमरावती जिल्ह्यातही भाजपच्या विरोधात सर्व पक्षाचे नेते एकवटले आहेत. तिवसा येथे कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. धामणगाव रेल्वे येथे आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. अमरावती जिल्ह्यातील आंदोलन राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते सहभागी झाले होते. 

संबंधित लेख