BJP Now Aims at Nagar Corporation | Sarkarnama

नगर महापालिका निवडणूक : महापालिकेत कमळ फुलविण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

मुरलीधर कराळे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नगर महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहनिती आखली असली, तरी शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसचे मोठे आव्हान या पक्षासमोर आहे. सध्या महापालिेकेत शिवसेनेची सत्ता आहे. माजी आमदार अनिल राठोड यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे. तशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. शहरातील मोठा युवा वर्ग आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आहे.

नगर : महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. सांगली व जळगाव या महापालिकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे नगरचे नेतेही हरकून गेले आहेत. 'जळगाव, सांगली झाँकी है, नगर अभी बाकी है..' अशा घोषणा देत या विजयाच्या मिरवणुकीत खासदार दिलीप गांधी यांनी कार्यकर्त्यांना नगर महापालिकेचा गड सर करण्याचा सल्ला दिला आहे.

नगर महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहनिती आखली असली, तरी शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसचे मोठे आव्हान या पक्षासमोर आहे. सध्या महापालिेकेत शिवसेनेची सत्ता आहे. माजी आमदार अनिल राठोड यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे. तशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. शहरातील मोठा युवा वर्ग आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आहे. शिवाय त्यांची कार्यकर्त्यांची फळी अत्यंत मजबूत आहे. या दोन्ही नेत्यांना धूळ चारण्यासाठी भाजपचे खासदार दिलीप गांधी यशस्वी ठरणार का, हे काळ ठरविणार असला, तरी दोन्हींमधीर मतांच्या फुटीचा फायदा आपल्याला होईल, अशी आशा भाजप नेत्यांना आहे.

विखे पाटील यांचे मोठे आव्हान
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र डाॅ. सुजय विखे काॅग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. तसे त्यांनी यापूर्वीही जाहीर केले आहे. त्यांना विरोधक म्हणून भाजपकडून खासदार दिलीप गांधी लढतील, त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या तयारीसाठी नगरची महापालिका ताब्यात घेण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून जोरदार रस्सीखेच होणार आहे. काॅग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे डाॅ. विखे पाटील राष्ट्रवादीला मदत करतील. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी व काॅग्रेसची ताकद नगर शहरात बळावेल. हा सर्वांत मोठा धोका शिवसेना व भाजपलाही आहे.

भाजपअंतर्गत बंडाळीचा धोका
भाजपअंतर्गत मतभेत मोठ्या प्रमाणात आहेत. नगर शहरात खासदार गांधी यांचा एक गट तर अॅड. अभय आगरकर यांचा दुसरा गट अशी विभागणी आहे. यानिमित्ताने दोन समाजाचे विभाजन झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे अंतर्गत बंडाळीची शक्यता गृहित धरले, तर भाजपला महापालिकेत पूर्णपणे यश मिळविणे अवघड जाणार आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाच नगरला लक्ष घालण्याची वेळ येईल, अशी चर्चा कार्यकर्त्यांतून होत आहे.

छिंदम प्रकरण मिटता मिटेना
भाजपचे पदच्युत कार्यकर्ते श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरून भाजपलाही अडचणीत आनले. या प्रकरणामुळे भाजपची मोठी बदनामी झाली आहे. त्याला पक्षाने काढून टाकले असले, तो भाजप विचारसरणीचाच आहे. त्याला आतून भाजपच्या काही लोकांकडून बळ मिळत असल्याचे बोलले जाते. तरी त्याने पुन्हा आपण नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगून महापाैरांवरच कारवाईचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या महासभेला पोलिस संरक्षणात उपस्थित राहून त्याने सर्वांचा रोष पुन्हा ओढून घेतला.

प्रशासनाने त्याला महासभेला येण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढली. त्यामुळे नगरसेवक विक्रम राठोड यांच्यासह शिवसेनेच्या तीस कार्यकर्त्यांवर गु्न्हे दाखल झाले. पुन्हा भाजपच्याच इशाऱ्यावर गुन्हे दाखल झाल्याचा ठपका सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे हे प्रकरण भाजप नेत्यांना मोठी डोकेदुखी बनली आहे. त्याचाही परिणाम भाजपला मोठा अडसर आहे.

संबंधित लेख