bjp nagarsevak marhan | Sarkarnama

"श्रीपूजक' भाजप नगरसेवकाला चंद्रकांतदादांसमोर चोप ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जून 2017

अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यावर आंदोलकांनी चप्पलफेक केली. तसेच त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करून कोल्हापुरी हिसका दाखवण्यात आला.

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यावर आंदोलकांनी चप्पलफेक केली. तसेच त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करून कोल्हापुरी हिसका दाखवण्यात आला. पालकमंत्री पाटील यांच्या समक्षच घडलेल्या या प्रकरणाने बैठकीतील वातावरण तणावपूर्ण बनले. श्री. पाटील यांच्या सूचनेनुसार अखेर ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात बैठकीबाहेर काढून घरी पाठविण्यात आले. 

कोल्हापुरातील अंबाबाई देवीला 9 जून रोजी घागरा-चोलीचा पेहराव करण्यात आला होता. श्रीपूजक व भाजप नगरसेवक श्री. ठाणेकर यांनीच ही पूजा बांधली होती. यावरून कोल्हापुरातील भक्तांत क्षोभ उसळला होता. 10 जून रोजी शिवसेनेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून श्री. ठाणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून हा वाद घुमसत आहे. 
यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता. 21) जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या उपस्थितीत पुजारी हटाव समर्थकांची बैठक झाली. त्यात शासनाने हस्तक्षेप करून पुजाऱ्यांना मंदीराबाहेर हटवण्याची मागणी करणारे निवेदन कृती समितीच्यावतीने देण्यात आले होते. गुरुवारी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी पुजारी हटाव संघर्ष समिती, सर्वपक्षीय नेते, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रीपूजकांची बैठक बोलाविली होती. प्रचंड तणावाच्या वातावरणात ही बैठक सुरु झाली. 

दोन्ही बाजूंचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी अंबाबाईला घागरा-चोळी नेसविणे हे चुकीचे असून याबद्दल श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी दोन दिवस आत्मक्‍लेश करावा असे सांगून ठाणेकर यांना दोन दिवस मंदिरात प्रवेशबंदी करावी, असा आदेश दिला. श्री. पाटील हे सांगत असताना श्री. ठाणेकर मात्र कुत्सितपणे हसत होते, त्यांच्या हसण्याकडे काही कार्यकर्त्यांचे लक्ष गेले आणि तेथूनच गोंधळाला सुरूवात झाली. काही महिला कार्यकर्त्यांनी थेट श्री. ठाणेकर यांच्या दिशेने चप्पला भिरकावल्या. ठाणेकर यांच्या हसण्यामुळे बैठकीत संतापाचे वातावरण पसरले. सर्वांनीच मग त्यांच्यावर चाल केली, यात महिला कार्यकर्त्या आघाडीवर होत्या. 
बैठकीचा रागरंग ओळखून श्री. पाटील यांनी ठाणेकर यांना बाहेर नेण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या. पोलीस त्यांना बाहेर घेऊन जात असतानाच काही कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम माराहाण करण्यास सुरूवात केली. पोलिसांचे त्यांच्या भोवती असलेले कडे तोडून कार्यकर्त्यांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. एका पोलिस वाहनातून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर बैठक सुरळित सुरू झाली पण वातावरण मात्र शेवटपर्यंत तंगच राहीले. 
 

संबंधित लेख