'टोल हटाव'साठी भाजप आमदाराचे वाढदिवशी आंदोलन
मनसरसह जिल्ह्यातील इतर टोलनाके स्थानांतरित करण्यासंदर्भात 29 ऑगस्टला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांची अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्लीत बैठक झाली होती. यात 1 जानेवारी 2019 पासून टोल स्थानांतरित होणार असल्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. यामुळे आता भाजप आमदारावर आंदोलनाची पाळी आली आहे.
मनसर : नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसरजवळचा टोलनाका 1 जानेवारीपासून हटणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. परंतू, हा टोल नाका हटणार नसल्याचे आता स्पष्ट झाल्याने रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी वाढदिवसालाच 'टोल हटाव'साठी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन केवळ नाटक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
मनसरसह जिल्ह्यातील इतर टोलनाके स्थानांतरित करण्यासंदर्भात 29 ऑगस्टला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांची अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्लीत बैठक झाली होती. यात 1 जानेवारी 2019 पासून टोल स्थानांतरित होणार असल्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. यामुळे आता भाजप आमदारावर आंदोलनाची पाळी आली आहे. आमदार रेड्डी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (ता. 21 डिसेंबर) 'टोल हटाव'चा नारा देत आंदोलनावर बसले.
टोल बंद होऊ शकत नसल्याने आंदोलन करीत असल्याचे मत स्थानिकांनी नोंदविले. आता येत्या 1 जानेवारीपर्यंत हा टोल नाका हटविण्याचे आदेश आला तरच आमदार रेड्डी यांना केक कापता येणार आहे. अन्यथा त्यांना लिंबू पाण्यावरच समाधान मानावे लागणार आहे. आंदोलनादरम्यान टोलमध्ये स्थानिकांना सवलत द्यावी, टोलनाका स्थानांतरित करावा व यासह अनेक मागण्या होत्या. हे साखळी उपोषण असणार असून 31 तारखेपर्यंत हे उपोषण चालणार आहे व टोल नाही हटला तर 1 जानेवारीला तारखेला आम्ही चक्का जाम करू, असे आमदार रेड्डी यांनी सांगितले.
हा टोल नाका स्थानांतरित होणार नाही. हे आंदोलन फक्त कंपनीला फायदा पोचविण्यासाठी होत आहे. केंद्र सरकारकडून 80 कोटी रुपये कंपनीला देऊन सेटलमेंट करून घेत आहे. आंदोलनामुळे करून 80 कोटींचे नुकसान झाल्याचे कंपनीला दाखवायचे आहे यासाठीच हे आंदोलन असल्याचा आरोप काँग्रेसचे स्थानिक नेते गज्जू यादव यांनी केला आहे.