BJP MLA raises slogans against own government | Sarkarnama

भाजप आमदार आशिष देशमुखांनी दिल्या सरकारच्या विरोधात घोषणा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे रस्ता रोको करून शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आमदाराच्या या कृतीमुळे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

नागपूर : भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे रस्ता रोको करून शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आमदाराच्या या कृतीमुळे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

बोंडअळीग्रस्तांना द्यावयाच्या नुकसान भरपाईतून नरखेड व काटोल तालुके वगळण्यात आली आहेत. नरखेड व काटोल तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाही या नुकसान भरपाईचा फायदा मिळावा, यासाठी आमदार देशमुख यांच्या नेतृत्वात आज नागपूर-अमरावती मार्गावरील कोंढाळी या गावात रस्ता रोको करण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळेही संत्रा, गहू व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी व नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला. 

यावेळी जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते उपस्थित होतो. या रस्ता रोको केल्यामुळे काही वेळ या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. यावेळी बोंडअळी ग्रस्त व गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 
आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना 7 पानी पत्र पाठविल्याने तसेच रेशिमबाग येथील अभ्यास वर्गाला हजेरी न लावल्याने भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. यावरून मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांच्याकडे मतभेद स्पष्ट झाले होते. काही दिवसांपूर्वी आमदार देशमुख यांनी नागपुरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निवेदन दिले होते. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दाचे संबंध निर्माण झाल्याचे बोलले जात होते. 

परंतु, आज झालेल्या आंदोलनात आशीष देशमुख यांनी पुन्हा निदर्शने करून राज्य सरकारवर तोफ डागली. 'होश मे आओ होश मे आओ, राज्य सरकार होश मे आओ', 'राज्य सरकार मुर्दाबाद' अशा घोषणा देऊन आमदार देशमुख यांच्या समर्थकांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. या घोषणांमुळे भाजपच्या कट्टर समर्थकांची चांगलीच अडचण झाली होती.
 

संबंधित लेख