BJP MLA Anil Gote Analysis | Sarkarnama

भाजपमध्येच राहून आमदार गोटेंची महापालिका निवडणुकीत वेगळी चूल...! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

पक्षाने सरकारचे संकटमोचक आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे येथील महापालिका निवडणुकीचे नेतृत्व सोपविले आहे. ते आमदार गोटे यांना खटकले. त्यामुळे त्यांनी उघडपणे मंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात टीकेची मोहीम उघडली. त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांचा करून घेतलेला प्रवेश व त्यांना देऊ केलेली उमेदवारी, निष्ठावंतांना डावलणे या मुद्यांवरून आमदार गोटे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. 

धुळे : महापालिका निवडणुकींतर्गत आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यात तीन मुद्यांच्या आधारे स्वकियांशीच लढा देणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांना पक्षाने 'एबी फॉर्म' दिलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी उमेदवारीत डावललेल्या निष्ठावंतांच्या 'स्वाभिमानी' भाजपसाठी लोकसंग्राम संघटनेची मदत घेऊन, या माध्यमातून सर्व 74 जागांवर उमेदवार दिल्याची भूमिका पत्रकारांसमोर मांडली. यातून आमदार गोटे यांनी आता स्वकियांशी बंड पुकारल्याचेही स्पष्ट चित्र समोर आले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे आमदारकीचा राजीनामा दिला नाही, महापौर पदासाठी स्वतःचे नाव जाहीर केल्याची घोषणा मागे घेत आहे, पत्नी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांची महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करीत आहे, मुलगा तेजस यास रिंगणात उतरवीत असल्याचे आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले. 

आमदार- मंत्र्यांमध्ये संघर्ष
पक्षाने सरकारचे संकटमोचक आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे येथील महापालिका निवडणुकीचे नेतृत्व सोपविले आहे. ते आमदार गोटे यांना खटकले. त्यामुळे त्यांनी उघडपणे मंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात टीकेची मोहीम उघडली. त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांचा करून घेतलेला प्रवेश व त्यांना देऊ केलेली उमेदवारी, निष्ठावंतांना डावलणे या मुद्यांवरून आमदार गोटे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. 

त्यात आमदार गोटे यांनी परस्पर प्रचार कार्यालय सुरू करणे, इच्छुकांच्या मुलाखती घेणे, राजकीयदृष्ट्या कोऱ्या पाट्यारूपी चेहरे देण्याची भूमिका जाहीर केली. परिणामी महिन्याभरापासून पक्षांतर्गत कलह सुरू होता. नेतृत्वासह 'एबी फॉर्म' प्रश्‍नी आमदार गोटे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, पक्षाने गोटेंना नेतृत्वात सामावून घेण्यास तयारी दर्शविली, 'एबी फॉर्म'चा अधिकार नाकारला. त्यामुळे आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेत वेगळी चूल मांडत असल्याचे स्पष्ट केले. 

भाजप विरुद्ध भाजप लढत
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "स्वाभिमानी भाजप इज इक्वल टू लोकसंग्राम या नावाने निवडणूक लढवू. महापालिका निवडणुकीत सर्व 74 जागांवर स्वाभिमानी भाजपचे प्रतिरूप असलेल्या लोकसंग्राम संघटनेमार्फत उमेदवार देत आहोत. शिट्टी चिन्हावर ते लढतील. मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळत राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे राजीनामा कधी देणार हे पुन्हा विचारू नका. मी भाजपमध्येच आहे. तसेच पूर्वीचा नोंदणीकृत, पण मान्यता नसलेला तेजस अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष असून त्याची महापालिका निवडणुकीत स्वाभिमानी भाजपसाठी मदत घेणार आहे. मी या पक्ष- संघटनेचा संस्थापक असलो तर सध्या साधा सदस्य नाही. दरम्यान, आमदार गोटेंच्या या भूमिकेमुळे धुळ्यात भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. महाजन, भामरे, रावल यांच्या गटाविरुद्ध आमदार गोटे, अशी भाजप विरुद्ध भाजप लढत पाहायला मिळेल. 

संबंधित लेख