bjp leaders will reach out t farmers doorstep | Sarkarnama

शेतकऱ्यांना समजाविण्यासाठी  भाजप नेते बांधावर जाणार 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई : शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 25 ते 28 मे दरम्यान शिवार-संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी पक्षातर्फे प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होणार आहेत. फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.

मुंबई : शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 25 ते 28 मे दरम्यान शिवार-संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी पक्षातर्फे प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होणार आहेत. फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत. 
सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा दावा करत विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढली होती. शेतकरी कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यात दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे भाजपविरोधात ग्रामीण भागात नाराजी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचे बोलण्यात येते. 
राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे या अभूतपूर्व शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत. त्यांनी सांगितले की, या संवाद उपक्रमात पहिल्या दिवशी गुरुवार 25 मे रोजी एकाच दिवशी सोळा हजार गावांमध्ये सोळा हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद करेल. हा उपक्रम रविवार 28 मे रोजी पूर्ण होईल तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल. 
ते म्हणाले की, पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये तर प्रदेशाध्यक्ष दानवे हे उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद करतील. त्याच दिवशी पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 एप्रिल रोजी भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप करताना चिंचवड येथे शेतकरी संवाद सभांच्या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार केलेल्या नियोजनाप्रमाणे 25 ते 28 मे या ठरलेल्या वेळी या शेतकरी संवाद सभा होणार आहेत. भाजपाच्या केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची पूर्ण माहिती होऊन वंचित शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा म्हणून हा संवाद होणार आहे. 

संबंधित लेख