BJP leaders are in a hurry to send haribhau Bagde for Lok Sabha | Sarkarnama

हरिभाऊ बागडे यांना लोकसभेला पाठवण्याची  भाजप नेत्यांना झाली घाई !

नवनाथ इधाटे 
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

हरिभाऊ बागडे यांच्या समोर शेकापची आमदार गणपतराव देशमुखांचा आदर्श आहे असे त्यांचे निकटवर्तीय म्हणतात . त्यामुळे त्यांना लोकसभेला पाठवायचे असा निर्धार भाजपमधील काही नेत्यांनी केला आहे असे दिसते . 

फुलंब्री: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.  हरिभाऊ बागडे यांना औरंगाबाद  लोकसभा मतदारसंघात उभे करून त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात संधी मिळावी म्हणून भाजपच्या जिल्ह्यातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत .

त्यांची विधानसभा लढवण्याची इच्छा असली तरी भाजप पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य  मानत ते लोकसभा निवडणूक लढवायला तयार होतील अशी चर्चा हे नेते करीत आहे. 

हरिभाऊ बागडे यांनी जनसंघाच्या दिवसांपासून काम केलेले आहे . १९८५, १९९०, १९९५, १९९९ असे सलग चारवेळा औरंगबाद ग्रामीण विधानसभेला ते निवडून आलेले होते . सलग वीस  वर्षे ते आमदार होते . मधली दहा वर्षे काँग्रेसचे कल्याण काळे आमदार होते पण २०१४ मध्ये पुन्हा हरिभाऊ आताच्या फुलंब्री मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . हरिभाऊ बागडे यांच्या समोर शेकापची आमदार गणपतराव देशमुखांचा आदर्श आहे असे त्यांचे निकटवर्तीय म्हणतात . त्यामुळे त्यांना लोकसभेला पाठवायचे असा निर्धार भाजपमधील काही नेत्यांनी केला आहे असे दिसते . 

अशावेळी बागडेंच्या फुलंब्री मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असेल? खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघात येणाऱ्या या मतदारसंघातील उमेदवारी देतांना त्यांच्या मताला देखील महत्व असणार आहे. तेव्हा फुलंब्रीतून उमेदवारीसाठी बागडे-दानवेंचा आशिर्वाद नेमका कुणाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 मोदी लाटेत हरिभाऊ बागडे यांनी विजय मिळवला आणि या विजयाने त्यांना थेट महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले. विधानसभा अध्यक्षांचा मतदारसंघ म्हणून देखील फुलंब्री मतदारसंघाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. 

विधानसभा अध्यक्ष झाल्यावरही हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघाशी कायम संपर्क राहिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील याच मतदारसंघातून लढण्याची त्यांची इच्छा असल्याचे बोलले जाते. परंतु केंद्र आणि राज्य पातळीवरील घडामोडी आणि शिवसेना-भाजप यांच्यात निर्माण झालेली दरी पाहता हे दोन्ही पक्ष पुन्हा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. 

अशावेळी शिवसेनेला टक्कर देऊ शकेल किंवा विजय मिळवू शकेल असा उमेदवार म्हणून हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाहिले जाते. बागडेंनी लोकसभा निवडणूक लढवली तर मग भाजपकडून विधानसभा कोण लढवणार यावर सध्या कथ्याकूट सुरू आहे. 

दादा-नाना समर्थक इच्छूक लागले कामाला 

फुलंब्री मतदारसंघात उमेदवार ठरवण्याचा अधिकार मतदारसंघाचे खासदार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनाच असणार आहे. त्यामुळे या दोघांच्याही समर्थकांनी आपापल्या परीने मतदारसंघात काम सुरू केले आहे. 

यामध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपच्या महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्षा अनुराधा चव्हाण आघाडीवर आहेत. महापालिकेतील उपमहापौर विजय औताडे यांनी देखील मतदारसंघात दौरे आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल वाढवली आहे . औताडेंनी  हम भी है मैदान मे चा संदेश दिला आहे. विशेष म्हणेजे अनुराधा चव्हाण आणि औताडे हे दोघेही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या शिवाय माजी मंत्री डॉ. नामदेव गाडेकर यांनी देखील आपले चिरंजीव डॉ. गिरीश गोडकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी कंबर कसल्याची चर्चा आहे. 

2014 मध्ये अनुराधा चव्हाण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून फुलंब्रीमध्ये लढल्या. 34 हजारावर मते मिळवत त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या फुलंब्रीमध्ये आपली ताकद वाढवून लोकसभा निवडणुकीत अधिकचे मते मिळवण्याच्या दृष्टीने खासदार रावसाहेब दानवे यांनी दोन वर्षापुर्वी अनुराधा चव्हाण यांना भाजपमध्ये घेतले. 

जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर अनुराधा चव्हाण सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. 2019 मध्ये विधानसभेचा शब्द त्यांना देण्यात आल्याची देखील चर्चा आहे. चव्हाण यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या विजय औताडे यांना देखील दानवे यांनी भाजपच्या मार्गावर आणले. नुसते आणलेच नाही तर महापालिकेत आधी आरोग्य सभापती, नंतर उपमपौरपद व भाजयुमोचे जिल्हाध्यक्षपदही बहाल केले. 

दानवे यांच्या आर्शिवादाने औताडे यांना पक्षात दाखल होताच छप्पर फाडके मिळाले, आता विधानसभेची उमेदवारी देखील मिळेल अशी आशा बाळगत औताडे कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत औताडे यांनीच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात प्रचार केला होता असे बोलले जाते. माजी मंत्री डॉ. नामदेव गाडेकर यांचा भाजप प्रवेश देखील दानवे यांच्या प्रयत्नातूनच झाला. 

राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार विराजमान झाल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्षपद स्वःताकडे येताच रावसाहेब दानवे यांनी आपल्या जालना लोकसभा मतदारसंघात विरोधकांचे पंख छाटण्याची मोहिम हाती घेतली होती. बागडे आमदार असलेल्या फुलंब्री मतदारसंघावर तर त्यांचे विशेष लक्ष होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षात दानवे यांनी फुलंब्री मतदारसंघात देखील हाच अजेंडा वापरल्याचे दिसून आले. 

संबंधित लेख