BJP installs letter boxes form Communication with Narendra Modi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

नरेंद्र मोदींशी संवादासाठी निवडणुकीच्या तोंडावर भाजपची 'पत्र संवाद पेटी'

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी नाविण्यपूर्ण संकल्पना आणली आहे. त्यासाठी उद्यापासून देशभरात नागरीकांना पंतप्रधान मोदींशी संवादासाठी 'पत्र संवाद पेटी' सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये नागरीक पंतप्रधान मोदींनी पत्राद्वारे आपल्या अपेक्षा व्यक्त करु शकतील. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. 12) गुजरात येथून त्याची सुरवात करतील.

नाशिक : यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी नाविण्यपूर्ण संकल्पना आणली आहे. त्यासाठी उद्यापासून देशभरात नागरीकांना पंतप्रधान मोदींशी संवादासाठी 'पत्र संवाद पेटी' सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये नागरीक पंतप्रधान मोदींनी पत्राद्वारे आपल्या अपेक्षा व्यक्त करु शकतील. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. 12) गुजरात येथून त्याची सुरवात करतील. आज प्रायोगिक स्तरावर नाशिकमध्ये पक्षाच्या कार्यालयात ही संवाद पेटी सुरु करण्यात आली

पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्‍याम जाजू यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, "भारत के मन की बात, मोदी के साथ है.... ही संकल्पना घेऊन हे अभियान सुरु केले आहे. त्याद्वारे प्रत्येक सर्वसामान्य नागरीकाला पंतप्रधान मोदींशी बोलता यावं याकरीता जागोजागी पत्र संवाद पेटी बसविण्यात येईल. उद्या (ता. 12) पासून 'मेरा परिवार, भाजप परिवार' या अभियानाची देशात सुरुवात गुजरातमध्ये अमित शहा करणार आहेत. पत्र संवाद पेटीतील सर्व पत्रांची दखल घेतली जाणार आहे. त्याकरीता विशेष समिती स्थापन केली आहे. नागरिक, शेतकरी, उद्योजक यासह सर्व स्तरातील लोकांशी हा संवाद होईल. याद्वारे पक्षाने मोठी संपर्क व प्रचार मोहिम आखली आहे. त्याद्वारे सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना पक्षाचे कार्यकर्ते संपर्क करणार आहेत. देशभरात येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत हे 'कमळ ज्योती' संपर्क अभियान राबविले जाईल." पक्षाचे हे व्यापक अभियान असुन ते नक्की यशस्वी होईल. त्याद्वारे देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेत येईल असा विश्‍वास जाजू यांनी व्यक्त केला.

जाजू म्हणाले, "प्रियांका गांधी वाड्रा प्रचारात आल्याने उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला जनाधार मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधी पक्ष सध्या चिंतेत आहेत. या चिंतेमुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही. आपण सत्तेत येण्यासाठी ते सर्व आपल्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांची ही महाआघाडी व त्यातील राजकीय पक्षांना जनता नाकारेल. कारण जनतेला पंतप्रधान मोदींवर विश्‍वास आहे. तो त्यांनी वारंवार व्यक्त केला आहे." शिवसेनेशी युती होणार का? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, शिवसेनेशी युतीचा निर्णय पक्षाची पार्लमेंटरी समिती घेणार आहे. लवकरच युतीबाबत चित्र स्पष्ट होईल.

संबंधित लेख